ऑनलाईनने तारलं पण ऑफलाईनने मारलं, इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या उत्तीर्ण होण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट
ऑनलाईन परीक्षा देताना इंजिनिअरिंग डिप्लोमा करणारे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होत होते. अचानक या सत्रात परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्याने ऑनलाईन परीक्षेत भरघोस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पितळ उघडे पडल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई : गेल्या दोन वर्षात इंजीनियरिंग आणि डिप्लोमाच्या परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे या ऑनलाईन (Online Exam) पद्धतीने पार पडल्या. त्यामुळे इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना गुण सुद्धा चांगले मिळाले. मात्र कोरोना गेल्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा ऑफलाईन सुरू झाल्या आणि त्यात इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का घसरला आहे. त्यामुळे ऑनलाईनने तारले आणि ऑफलाईन मारलं अशी विद्यार्थ्यांची अवस्था झाली आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज ऑनलाईन सुरू होते. त्यामुळे सहाजिकच परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात होत्या. ऑनलाईन परीक्षा देताना इंजिनिअरिंग डिप्लोमा करणारे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होत होते. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सुद्धा 90 ते 95 टक्के इतकं होतं. मात्र अचानक या सत्रात परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्याने ऑनलाईन परीक्षेत भरघोस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पितळ उघडे पडल्याचे चित्र दिसत आहे. कारण ऑफलाइन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का 30 ते 40 टक्क्यांनी घसरला आहे. दोन वर्षानंतरही अजूनही अनेक विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा देतांना अडचणींचा सामना करावा लागतो.
काय आहेत अनुत्तीर्ण होण्याची कारणे?
- ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मानसीक तयारी नव्हती त्यामुळे ऑफलाईन परीक्षेचा पुरेसा सराव केलेला नव्हता
- परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या संभ्रमात विद्यार्थी होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारी नेमकी कशी करायची ? हा प्रश्न होता
- विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेसाठी लागणारा लिखाणाचा सराव राहिलेला नाही. दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना त्यामुळे अडचणी येत आहे
- दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षा दिल्याने अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास पुरेसा न झाल्याने पाया कच्चा असल्याचेही दिसून येत आहे
ऑनलाईन परीक्षा जेव्हा विद्यार्थ्यांकडून दिल्या जायच्या तेव्हा त्यात कॉपीचे प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते, एबीपी माझाने ते उघडकीस सुद्धा आणले. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा देताना कितपत तयारी विद्यार्थ्यांनी केली हा प्रश्न आहे. त्यामुळेच ऑफलाईन परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांचा निकाल हा अशा पद्धतीने समोर येत आहे.
इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांनी तारले आणि ऑफलाईने मारलं जरी असे असलं तरी यापुढील ऑफलाईन परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना मानसिक तयारी करणे गरजेच आहे. शिवाय आपला अभ्यासातला पाया मजबूत करून परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याची गरज आहे. नाहीतर भविष्यात या ऑफलाईन परीक्षांमुळे वेळोवेळी असाच मार विद्यार्थ्यांना खावा लागेल आणि निकालांमध्ये त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळेल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI