Akola Assembly Election : अकोला पश्चिममध्ये गोवर्धन शर्मानंतर कुणाला मिळणार तिकीट? काँग्रेसकडून कोण देणार टफ ‘फाइट’?
Akola Assembly Election : तब्बल 29 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्त्वाला कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत.
अकोला: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा गड राखण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे असणार आहे. लोकसभा निवडणुकीत ‘अकोला पश्चिम’मध्ये काँग्रेसनं 12 हजारांवर मतांची आघाडी घेतली घेतल्यानं भाजपच्या चिंतेत वाढ झाली. तब्बल 29 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्त्वाला कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल 29 वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे ज्येष्ठ नेते, तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचं 3 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे. लोकसभा निवडणुकीबरोबर अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, उच्च न्यायालायानं ही निवडणूक रद्द केली.
शर्मा यांनी तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. सलग सहा निवडणुकांत विजय खेचून आणणाऱ्या शर्मा यांच्या पश्चात ती परंपरा कायम राखण्याचं आव्हान भाजपपुढे आहे.
भाजपकडून कोण इच्छुक?
भाजप नेतृत्त्व शर्मा कुटुंबात उमेदवारी देते, की अन्य कुणाला संधी देणार हे पाहावे लागणार आहे. गोवर्धन शर्मा यांचे पूत्र कृष्णा शर्मा हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. याशिवाय माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी, ॲड. मोतीसिंह मोहता, विजय अग्रवाल, गिरीश जोशी यांच्यासह 22 पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेसची स्थिती काय?
2019 आणि त्यानंतर रद्द झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. आता देखील त्यांच्यासह काँग्रेसकडे 19 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात इंटकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप वखारिया, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी महापौर मदन भरगड, रमाकांत खेतान, विवेक पारसकर, चंद्रकांत सावजी यांचा समावेश आहे.
2019 ची स्थिती काय?
गोवर्धन शर्मा – भाजप – 73 हजार 262 मते
साजिद खान – काँग्रेस – 70 हजार 669 मते
गोवर्धन शर्मा यांचा 3 हजार मतांनी विजय झाला.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI