(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोवा बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केलीय.
पणजी : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षेसंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागातील अधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीवरून हा निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले की, शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार दहावीचे गुण देण्यात येतील.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटी परीक्षेत संधी दिली जाईल. विज्ञान आणि पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गोवा बोर्डामार्फत घेण्यात येणाऱ्या एकदिवसीय परीक्षा द्यावी लागेल. अशा विद्यार्थ्यांना एक दिवसीय परीक्षेबद्दल 15 दिवस अगोदर माहिती दिली जाईल. ते म्हणाले की, बारावीच्या परीक्षेसाठी मंगळवार किंवा बुधवारी निर्णय घेण्यात येईल.
सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा व्हायला हवी असे सांगितले. परंतु, दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, आधी विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हायला हवे, त्यानंतर परीक्षा घ्यावी.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI