'वन्समोअरला मराठीत पर्यायी शब्द नाही, एखादा इंग्रजीत यमक जुळवावा लागतो'; मराठीचे वाभाडे काढणाऱ्या कवितेवर शिक्षणमंत्र्यांचं अजब स्पष्टीकरण
Deepak Kesarkar : इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेमुळे चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Deepak Kesarkar : 'वन्समोअरला पर्यायी शब्द नाही आहे. एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजी शब्द येऊ शकतो', असं अजब स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बालभारतीच्या कवितेवर दिलं आहे. इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे वाचक वर्गानेही त्या कवितेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता यावर शिक्षणमंत्र्यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
'जंगलात ठरली मैफल' असं बालभारतीच्या पुस्तकातील कवितेचं नाव आहे. या कवितेमध्ये फक्त यमक जुळवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचप्रमाणे मराठीच्या पुस्तकातील या कवितेमध्ये अनेक हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा देखील वापर केला गेलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारची भाषा शिकवण्यावर सध्या आक्षेप घेतला जातोय.
वन्समोअरला मराठीत पर्यायी शब्द नाही - दीपक केसरकर
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'वन्समोअरला पर्यायी शब्द नाही. एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजीतून येऊ शकतो. त्यामुळे त्याचा फार मोठा बाऊ करण्याची गरज नाही. काही शब्द रुढ झाले आहेत. आपण टेबलला टेबलच म्हणतो,कपबशीला कपबशीच बोलतो. मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचे धोरण मीच आणलं त्यामुळे मला मराठीचा सगळ्यात जास्त अनुभव असणार. 18 वर्ष मराठी भाषेचं धोरण आलं नव्हतं, तेव्हा कोणाला त्याचा कळवळा आला नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे.
आपण तेव्हा पुन्हा एकदा, पुन्हा एकदा असं म्हणत नाही - दीपक केसरकर
पुढे त्यांनी म्हटलं की, 'ज्यावेळी आपण एखाद्या खेळाडूंना किंवा एखाद्या गायकाने मराठीतलं चांगलं क्लासिकल गाणं जरी म्हटलं तरी त्याला आपण वन्समोअर,वन्समोअर असं म्हणतो. त्याला आपण पुन्हा एकदा, पुन्हा एकदा असं टाळ्या वाजवून नाही म्हणत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, काही शब्द हे रुढ झालेले आहेत आणि मुलांना देखील त्याच शब्दांची सवय झालेली असते. यामध्ये त्यामधील तज्ज्ञ व्यक्ती काम करत असतात, त्या कामामध्ये माझा काहीही हस्तक्षेप नसतो.तरी मी समितीला एकदा विचार करायला सांगतो. मात्र समितीत देखील साहित्यिक असतातच.'
तरी मी समितीला एकदा विचार करायला सांगतो. मात्र समितीत देखील साहित्यिक असतातच. '
बालभारतीच्या पुस्तकातील 'ती' कविता
'जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल,
तबल्यावर होती कोल्होबाची साथ
वाघोबा म्हणाले, नाही ना बात ?
पेटी मी किती वाजवतो सुंदर
हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस
संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां
आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !
दरम्यान काहीच महिन्यांपूर्वी शालेय शिक्षण विभागाकडून मराठी भाषेचं शिक्षण देणं हे अनिवार्य करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे ज्या शाळेत हे शिक्षण दिलं जाणार नाही, त्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल, असा नियम देखील काढण्यात आला. पण दुसरीकडे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्त निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या कवितेमध्ये मराठीचे वाभाडे काढण्यात आलेत. त्यावर आता शिक्षणमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर ती कविता काढली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
ही बातमी वाचा :
'ठुमकत नाचणारा मोर अन् वन्समोअर, वन्समोअर...' बालभारतीच्या पुस्तकातच मराठीचे वाभाडे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI