11th Admission 2025 : अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार की नाही? लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा, शिक्षण संचालनालयाचा गोंधळ सुरूच
11th Admission 2025 : अल्पसंख्यांक संस्थांतील आरक्षण निर्णयातील बदल आणि तांत्रिक अडचणीमुळे गुणवत्ता यादी जाहीर करण्याबाबत शिक्षण संचालनालयाचा गोंधळ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

11th Admission 2025 : राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार की पुन्हा प्रक्रिया लांबणीवर पडणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण अल्पसंख्यांक संस्थांतील आरक्षण निर्णयातील बदल आणि तांत्रिक अडचणीमुळे गुणवत्ता यादी जाहीर करण्याबाबत शिक्षण संचालनालयाचा गोंधळ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागलेली आहे.
राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. निकाल जाहीर होऊन जवळपास आता दीड महिना होत आलाय. मात्र, अजूनही दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अकरावीमध्ये प्रवेश झालेला नाही. विद्यार्थी अजूनही पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. आज अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. या पहिला गुणवत्ता यादीची सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.
शिक्षण संचालनालयाकडून गोंधळ सुरूच
जवळपास 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातून नोंदणी केली आहे. तीन वेळा वेळापत्रक बदलल्यानंतर आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, अजूनही गुणवत्ता यादी जाहीर करण्यासंदर्भात शिक्षण संचालनालयाकडून गोंधळ सुरू आहे. यामध्ये मुख्यत्वे करून सॉफ्टवेअर, वेबसाईटमधील तांत्रिक अडचणी आणि अल्पसंख्यांक संस्थांमधील आरक्षणासंबंधी झालेला गोंधळ, बदललेला निर्णय यामुळे हा उशीर गुणवत्ता यादी जाहीर करण्यास लागत असल्याची माहिती आहे.
पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी जाहीर होणार?
अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीबाबत सविस्तर बाबी आज दुपारी जाहीर होणार आहेत. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिककडून कळविण्यात येत आहे. त्यामुळे पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी पाच वाजता जाहीर होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लांबणीवर कसे पडले?
- यावर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लवकर पार पडून अकरावीचे शैक्षणिक वर्ष लवकर सुरू व्हावे, यासाठी दहावी बोर्ड परीक्षा दोन आठवडे लवकर घेण्यात आली.
- दहावी बोर्ड परीक्षेचा निकालही दोन आठवडे लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेऊन 13 मे रोजी हा निकाल जाहीर केला.
- 13 मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 19 मे रोजी राज्यभरातील ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यामध्ये 21 मेपासून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.
- अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवेश प्रक्रिया राबवताना अडचणींना सामोरे जावं लागलं आणि 21 मे ऐवजी अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलून ती 26 मे करण्यात आली.
- या सगळ्या तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रकानुसार 3 जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली.
- त्यानंतर नवीन वेळापत्रक बनवण्यात आले आणि यामध्ये 10 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले.
- यात अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरायचा राहिल्याने पुन्हा एकदा वाढीव वेळ विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी देण्यात आला. शिवाय इतर तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी वेळ घेऊन पहिली गुणवत्ता यादी थेट 26 जूनला जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
- यामध्ये अल्पसंख्यांक संस्थांमधील आरक्षणाचा विषय आणि त्यातील गोंधळ समोर आल्यानंतर अल्पसंख्यांक संस्थांमध्ये आरक्षणाचा पूर्वीचा निर्णय अंमलात आणण्यात आला. त्यानुसार पुन्हा एकदा गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती आहे.
- त्यामुळे आज वेळेत पहिली गुणवत्ता यादी जाहीर व्हावी, यासाठी शिक्षण संचालनालयाकडून जरी प्रयत्न केले जात असले तरी यादी जाहीर होणार की लांबणीवर पडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
सरकारी बँकेत अधिकारी होण्याची मोठी संधी! 541 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

























