आधी अपहरण केलं, मग निर्घुणपणे संपवलं; वसईत टोळक्याचा उच्छाद, खळबळजनक घटनेनं शहर हादरलं!
Vasai Crime: हत्येच्या घटनेनं वसई शहर पूरतं हादरुन गेलं आहे. माणसं जमवून, अपहरण करून, निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vasai Crime News: वसई : पूर्ववैमनस्यातून नालासोपाऱ्यात (Nala Sopara) 27 वर्षांच्या तरुणाचं अपहरण करून, त्याची धारदार हत्यारानं वार करून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना वसईत (Vasai Crime) घडली. शुक्रवारी 12 जानेवारी 2024 रोजी उघड झालेल्या घटनेनं संपूर्ण वसई शहर हाजरुन गेलं आहे. दोन रिक्षांमधून आलेल्या 9 ते 10 जणांच्या टोळक्यानं तरुणाचं अपहरण करुन हत्या केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, टोळक्यानं सर्वात आधी 27 वर्षीय तरुणाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या केली आणि हत्येनंतर मृतदेह रस्त्यावर फेकून सर्व आरोपी फरार झाले.
हत्येच्या घटनेनं वसई शहर पूरतं हादरुन गेलं आहे. माणसं जमवून, अपहरण करून, निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी पोलीस आयुक्तालयातही गुन्हे शाखेच्या 4 आणि पेल्हार पोलीस ठाण्याच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
सुधीर सिंह (वय 27) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून, हा तरुण कांदिवली येथे राहणारा आहे. 5 वर्षांपूर्वी हा तरुण नालासोपाऱ्यात राहत होता. गुरुवारी सुधीर सिंग हा त्याचा मित्र वैभव मिश्रा याच्यासोबत नालासोपारा पूर्व वालईपाडा उपाध्याय नगर चाळीत रूम बघण्यासाठी आला होता. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास 9 ते 10 जणांचं टोळकं दोन रिक्षात भरून आलं. गौराईपाडा पार्किंगच्या मोकळ्या जागेत या टोळक्यानं लाकडी दांडे, धारदार हत्यारानं सर्वात आधी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रिक्षात घालून, गावराईपाडा नाक्यावर नेऊन फेकून दिलं आणि सर्व आरोपी तिथून फरार झाले. रात्री साडेबाराच्या सुमारास मयताच्या मित्रानं पेल्हार पोलिसांना याची माहिती दिली असता, पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम पाठवून शोध घेतला असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह नालासोपारा पूर्व गावराईपाडा येथे आढळून आला. या अपहरण आणि हत्येच्या थरारानं नालासोपारा पूर्व संतोषभूवन, बिलालपाड, श्रीराम नगर, गावराईपाडा, धणीवबाग, नवजीवन परिसरात भीतीचं वातवरण पसरलं आहे.
दरम्यान, आरोपींनी पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आम्ही गुन्हा दाखल करून, गुन्हे शाखेच्या 3, मध्यवर्ती गुन्हे शाखा 01, आणि आमच्या तीन अशा 7 वेगवेगळ्या टीम आरोपींचा शोध घेत आहेत. दोघांची ओळख पटली आहे. आम्ही लवकरच आरोपी पकडण्यात यश मिळवू, असं आश्वासन पोलिसांच्या वतीनं देण्यात आलं आहे.