Yavatmal : पतीच निघाला 'पूजा'च्या हत्येचा मास्टरमाईंड; घरगुती कारणावरुन वाद झाल्याने खून
पूजाच्या हत्येच्या प्रकरणी तिच्या पतीसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घरगुती कारणावरून वाद वाढत गेला आणि त्यातूनच हा खून झाल्याचं पुढे आलं आहे.
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील सावंगा शिवारात पूजा कावळे या विवाहितेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यानंतर पूजाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरघुती वादातून तिच्या पतीनेच ही हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील वाई गौळ येथील पूजा कावळेचे सेवानिवृत्त सैनिक अनिल कावळे याच्यासोबत सन 2013 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही वर्षाने पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद वाढत गेले. हा वाद विकोपाला गेल्याने पत्नी पूजा कावळे हीने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर प्रकरण घटस्फोटासाठी न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून पूजा ही माहेरीच राहत होती.
अशात 10 नोव्हेंबर रोजी पूजा घरातून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. मात्र ती पुण्यात पोहचली नसल्याने कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर पूजा बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात नोंदविली. त्यानंतर 16 नोव्हेंबरला पूजा कावळे हीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिग्रस तालुक्यातील सावंगा ते चिरकुटा मार्गे असलेल्या चव्हाण यांच्या शेतात आढळल्याने खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. यात पुजाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र हत्या कुणी केली, हे कळायला मार्ग नव्हता.
दरम्यान या प्रकरणी दिग्रस पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर दिग्रस पोलिस, एलसीबी, सायबर सेल अशी वेगवेळगी चार पथक तयार करण्यात आली. या पथकांनी मारेकऱ्यांची शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर पोलिस पथकाला पूजा कावळे हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले.
विशेष म्हणजे पूजा हिचा पती अनिल कावळे हाच या हत्या प्रकरणात मास्टर माईंड असल्याचं देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी अनिल कावळे, उज्वल नगराळे (वय 22 वर्ष रा. राळेगाव), गौरव राऊत (वय 21 वर्ष रा. कळंब) आणि अभिषेक म्हात्रे (वय 24 वर्ष रा. शिंदी जि. अमरावती) या चौघांना अटक करण्यात आली.
संबंधित बातम्या :
- Yavatmal : डॉ. अशोक पाल हत्याकांडाचा उलगडा; धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणातून भांडण आणि हत्या, तिघांना अटक
- Aurangabad Scam : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या 30-30 घोटाळा प्रकरणी पहिला गुन्हा; हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
- Beed Crime : अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरण; मुलीला जेवण्याचं अमीष दाखवून अत्याचार करणारा नराधम गजाआड