शेतीचा वाद विकोपाला, दिरानं वहिनीचा गळा घोटला; 14 दिवसांपासून बेपत्ता महिला अखेर सापडली, पण वेळ निघून गेलेली!
Crime News: यवतमाळच्या मंगरुळ येथ मागील 14 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आला.
Yavalmal Crime News: यवतमाळमध्ये (Yavatmal News) घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला. यवतमाळच्या मंगरुळ येथील एक महिला गेल्या 14 दिवसांपासून बेपत्ता होती. महिलेच्या पतीनं यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली. तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेचा कसून तपास सुरू केला. पोलीस तपासात, 14 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेची हत्या (Crime News) झाल्याचं समोर आलं. उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेनं खळबळ माजली आहे.
यवतमाळच्या मंगरुळ येथ मागील 14 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आला. मृत महिलेच्या पतीची तक्रार आणि यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या तपासातून बेपत्ता महिलेच्या प्रकरणाचा छडा लागला. महिलेच्या दिरानंच शेतीच्या वादातून महिलेची गळा आवळून हत्या केल्याचं उघडकीस आलं. साधना संजय जोगे (40) असं मृत विवाहित महिलेचं नाव असून नाना उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे (40) असं आरोपी दिराचं नाव आहे. पती संजय जोगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीस अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
मृत महिला 30 नोव्हेंबरला सकाळी तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी स्वत:च्या शेतात गेली होती. मात्र त्यानंतर महिला घरी परतलीच नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेही महिलेचा पत्ता लागला नाही. त्यानंतर महिलेच्या पतीनं तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला 1 डिसेंबरला महिला हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आणि महिलेचा शोध सुरू केला. दरम्यान, काल (शुक्रवारी) महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शेतालगत असलेल्या खरोटे यांच्या शेतातील ऊस पिकात आढळून आला.
दरम्यान, पोलिसांना महिलेच्या दिरावर संशय आल्यानं त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर महिलेच्या हत्येचा उलगडा झाला. शेतीच्या हिस्स्याच्या वादातून तसेच एक एकर शेती विक्री करण्यास अडथळा आणत असल्यानं स्वतःच्या वहिनीची हत्या केल्याची कबुली महिलेच्या दिरानं दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास यावतमाळ ग्रामीण पोलीस ठाणं करीत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, एकजण ताब्यात, नेमकं काय घडलं?