Yavatmal News : बोगस बियाणे विक्रीचा सिलसिला सुरूच! प्रतिबंधित बियाणे विक्री करणाऱ्या दोघांच्या अटकेसह चौघांवर गुन्हे दाखल
प्रतिबंधित बियाणे विक्री प्रकरणी कृषी विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात राज्यात प्रतिबंधित असलेल्या कपाशी बियाण्यांची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
Yavatmal News यवतमाळ : खरीप हंगाम आता तोंडावर आला असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. अशातच राज्यात बोगस बियाणांचा (Prohibited Seeds) सुळसुळाट असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. या बोगस बियाणांच्या विक्री प्रकरणी कृषी विभाग सतर्क झाले असून अशा बोगस आणि प्रतिबंधित बियाणे विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवून आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal News) छुप्या पद्धतीने प्रतिबंधित असलेल्या कपाशी बियाणांची विक्रीचा सिलसिला सुरूच असल्याचे बघायला मिळाले आहे.
अशातच आता प्रतिबंधित बियाणे (Prohibited Seeds) विक्री प्रकरणी यवतमाळच्या कृषी विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात राज्यात प्रतिबंधित असलेल्या कपाशी बियाण्यांची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी बियाण्यांसह एकूण 8 लाख 33 हजाराचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून चार संशयित आरोपींवर (Yavatmal Crime) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्ह्यातील वडकी आणि शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलीय.
बोगस बियाणे विक्रीचा सिलसिला सुरूच!
यवतमाळच्या कृषी विभागाला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, काही अज्ञात व्यक्ति एका सुझुकी ब्रेझा कारमध्ये वडकी येथे अनधिकृतपणे कपाशी बियाने विक्री करीता घेवुन येणार आहेत. या गोपनीय माहितीवरून कृषी विभागाने या परिसरात सापळा रचला. दरम्यान, यावेळी सुझुकी ब्रेझा (वाहन क्र. एमएच 41 एई 6196) हे खैरी बसस्थानकाकडे येत असल्याचे दिसून येताच त्याची अडवणूक करण्यात आली.
दरम्यान, या वाहनाची झडती घेतली असता यात एका प्लास्टीकच्या पोत्यात अंदाजे 33 किलो खुले कपाशी बियाने ज्याची किंमत 1 लाख 5 हजार रुपये इतके बियाणे आढळून आले. हे बियाने कोठुन आणले याबाबत विचारपुस केली असता, त्यांनी ते बियाने सागर पारलेवार यांच्याकडुन विक्री करीता आणले असल्याचे सांगीतले आहे.
दोघांच्या अटकेसह चौघांवर गुन्हे दाखल
या प्रकरणी विलास नानाजी देवेवार, अविनाश संतोषराव निकम असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर सागर अरुन पारलेवार (रा. कोठारी ता. बल्लारशा जि. चंद्रपुर) आणि अमोल विजय चिकनकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर अशीच एक दुसरी कारवाई वणी तालुक्यातील पिंपरी कायर मार्गावर करण्यात आली. यात अमोल विजय चिकणक हे बोगस बियाण्यांची विक्री करताना आढळून आले आहेत.
या कारवाईत त्याच्याकडून अनधिकृत कापूस बियाण्यांची 12 पॉकेट,ज्याची अंदाजे किंमत 18 हजार रुपये विक्रीकरितांना मिळून आले आहे. या प्रकरणी पोलीस आणि कृषी विभाग अधिक तपास करत असून जिल्ह्यात अजून काही ठिकाणी असा गैरप्रकार सुरू आहे का, त्याचा शोध देखील घेतला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या