Mumbai Crime : परदेशी जाण्यासाठी पैसे नाकारले, मायलेकाने मिळून केली बँक अधिकाऱ्याची हत्या
परदेशी जाण्यासाठी पैसे नाकारल्याने मुलाने आणि पत्नीने मिळून बँक अधिकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक अंधेरीत घटना घडली आहे.

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याची त्याच्या मुलाने आणि पत्नीने मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाला कामानिमित्त परदेशी जायचे होते. मात्र, बँक अधिकारी असणाऱ्या वडिलांनी पैसे देणे नाकारल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
54 वर्षीय बँक अधिकारी संतनकृष्णन शेषाद्री, पत्नी जयशीला आणि मुलगा अरविंद या आपल्या त्रिकोणी कुटुंबासोबत अंधेरीतील आंबोली परिसरात राहत होते. संतनकृष्णन यांचा मुलगा अरविंद याला काम करण्यासाठी न्युझीलँडला जायचे होते. न्युझीलँडला जाण्यासाठी त्याने वडिलांकडून पैशाची मागणी केली होती. मात्र, वडिलांनी मुलाला पैसे देणे नाकारले. मुलाला पैसे न दिल्याच्या रागामुळे त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी मिळून संतनकृष्णन यांची हत्या केली.
काल (11 फेब्रुवारी) पहाटे पाचच्या सुमारास संतनकृष्णन गाढ झोपेत असताना, त्यांचा मुलगा आणि पत्नी यांनी मिळून त्यांचे डोके बेडरूममधील बेडच्या लाकडी भागावर तीन-चार वेळा जोरात आपटले. संतनकृष्णन यांची हत्या आत्महत्या वाटावी यासाठी माय-लेकाने मिळून त्यांची हाताची नस कापून आत्महत्येचा देखावा निर्माण करत, त्यांना मृतदेह सातव्या माळावरील घरातील बेडरूमच्या गॅलरीतुन खाली फेकून दिला. या निर्दयी खुनानंतर त्यांनी भिंतीवरील रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला.
सदर घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिला जयशीला संतनकृष्णन शेषाद्री आणि त्यांचा मुलगा अरविंद संतनकृष्णन शेषाद्री यांना अटक केली आहे. यासंदर्भात अधिक तपास आंबोली पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
- Nagpur Crime : नागपूर हादरलं! 65 वर्षीय वृद्धेवर बलात्काराची घटना उघडकीस
- Nagpur Crime : धक्कादायक! सोशल मीडियावरील ओळख महागात, नागपुरात तरुणीवर सामूहिक अत्याचार
- Pune Crime : धक्कादायक ! 11 वर्षीय मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























