पोटच्या दोन मुलांचा खून केला, व्हिडीओ रेकॉर्ड करुन दुसऱ्या पत्नीला पाठवला; पश्चिम बंगलमधल्या आरोपीला मुंबईत बेड्या
West Bengal Murder :पश्चिम बंगालमधील व्यक्तीने पोटच्या मुलीचा आणि मुलाचा खून करुन त्यानंतर त्यांचा व्हिडीओ बनवून दुसऱ्या पत्नीला पाठवला. खून करुन तिथे पळ काढलेल्या आरोपीला मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या
West Bengal Double Murder Accused Arrested : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट-7 ने अशा व्यक्तीला अटक केली आहे, ज्याने आपल्या दहा वर्षाच्या मुलाचा आणि 12 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली होती. खुदाबक्ष इमरान शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याने 26 मे रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये आपल्या दोन मुलांची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर तिथून पळ काढून आरोपी मुंबईत लपला होता. इतकंच नाही तर दोन्ही मुलांचा खून केल्यानंतर आरोपीने त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करत दुसऱ्या पत्नीला पाठवले होते. पत्नीच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुदाबक्ष इम्रान शेख (30) असे आरोपीचे नाव असून ती पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. शेखने अल्पवयीन असताना लग्न केली. त्याला 10 वर्षांचा मुलगा अलीम आणि 12 वर्षांची मुलगी रीना अशी दोन अपत्ये आहेत. आरोपी शेखने तीन लग्ने केली. या दोन अपत्यांची आई आणि त्याच्या पहिल्या पत्नीचा ठावठिकाणा माहित नाही. आरोपी दुसरी आणि मुलांसोबत राहत होता. त्याने नुकतंच तिसर लग्न केलं. यावरुन त्याची दुसरी पत्नी आणि त्याच्यामध्ये वारंवार भांडणं होत असतं. यामध्ये दोन्ही मुलंही भरडली जात होता. आरोपी पत्नीला मारहाण करुन तिचा छळ करायचा. नेहमीच्या भांडणामुळे खुदाबक्ष शेख वैतागला होता. 26 मे रोजी पुन्हा भांडण झाल्यावर त्याने रागाच्या भरात मुलांचा गळा आवळून त्यांचा खून केला, अशी माहिती युनिट 7 चे पोलिस निरीक्षक सुधीर जाधव यांनी दिली.
मुलांचा खून करुन आरोपी शेख थांबला नाही. त्याने मृत मुलांचे फोटो घेऊन, त्यांचे व्हिडीओ बनवून पत्नीला पाठवले. यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. शेख मुंबईत आला आणि मुलुंडमध्ये त्याच्या मित्राकडे राहू लागला. मित्राने त्याला बिल्डरच्या ठिकाणी नोकरीही दिली, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. आरोपीच्या मित्राला गुन्ह्याची माहिती नव्हती. शेखच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर मुर्शिदाबाद परिसरातील बेल डांगा पोलीस ठाण्यात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
तपासादरम्यान, पश्चिम बंगाल पोलिसांना आरोपी मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक 2 जून रोजी मुंबईत आलं. मुंबई गुन्हे शाखा युनिट 7 ने चौकशी सुरु केली. आरोपीचं ठिकाण शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव आणि पोलिस उपनिरीक्षक रामदास कदम यांनी तांत्रिक विश्लेषण केलं. तो मुलुंडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळआलं. त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांच्या पथकासोबत जाऊन त्याला अटक करण्यात आली, असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. शेखला शनिवारी (4 जून) किला कोर्टात हजर करण्यात आले आणि त्याला 9 जूनपर्यंत ट्रान्झिट रिमांडवर पाठवण्यात आलं. पश्चिम बंगाल पोलीस आता शेखला पुढील तपासासाठी त्याच्या मूळगावी घेऊन जाणार आहेत, असं अधिकाऱ्याने सांगितलं.