Ujjain Rape Case : उज्जैनमध्ये 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं खळबळ, या प्रकरणात मागील 48 तासांत काय-काय घडलं?
Ujjain News : उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात मागील 48 तासांत काय-काय घडलं, जाणून घ्या.
Ujjain Rape Case : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) 'महाकाल' नगरी उज्जैनमध्ये (Ujjain) एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Minor Girl Rape Case) झाल्याच्या घटनेनं संपूर्ण देश (Crime News) हादरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अर्धनग्न अवस्थेत मदतीसाठी दारोदार फिरत होती. मात्र, नागरिकांनी तिला मदत केली नाही. निर्दयी लोकांनी माणुसकीला काळीमा फासला. रक्तबंबाळ अवस्थेत अल्पवयीन मुलीने आठ किलोमीटरचं अंतर पायी कापलं. यावेळी तिने लोकांकडे मदतही मागितली. पण, कुणीही तिच्या मदतीला धावलं नाही.
उज्जैनमधील घटनेनं देश हादरला
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर नराधमांनी तिला उज्जैनमधील बडनगर रोडवर फेकलं. यानंतर पीडिता अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत उज्जैनमधील रस्त्यांवर मदतीसाठी फिरत होती. यानंतर अल्पवयीन मुलगी दांडी आश्रमाजवळ पोहोचली तिथे काही लोकांनी तिच्या अंगावर कपडे टाकून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु झाला. सध्या पीडितेवर उपचार सुरु आहेत. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न
लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रिक्षाचालक भरत सोनी याला अटक केली. त्यानंतर पोलीस तपासासाठी आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले मात्र, यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो पडून जखमी झाला. त्यानंतर आरोपीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणातील 24 वर्षीय मुख्य आरोपी भरत सोनी उज्जैनमधील नानाखेडा परिसरातील रहिवासी आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरुन पुढील तपास सुरु
पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिरुपती ड्रीम कॉलनीमधील हा सीसीटीव्ही व्हिडीओ 1 मिनिट 7 सेकंदाचा आहे. यामध्ये ती एका व्यक्तीशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
तपासात सहकार्य करण्याचं पोलिसांचं आवाहन
पोलीस अधिक्षक (SP) सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुढील तपासासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपासासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे. यासंदर्भात नागरिकांकडे कोणतीही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कुटुंबीयांकडून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार
पोलिसांना पीडित मुलगी सापडली तेव्हा ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. अल्पवयीन पीडिता सतना येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, पीडिता बेपत्ता झाल्यानंतर 48 तासांना नेमकं काय घडलं हे पुढील तपासानंतरच समोर येईल.
पीडितेनं काय सांगितलं?
पीडितेची प्रकृती थोडी सुधारल्यानंतर तिने पोलिसांना माहिती देत जीवन खेरी येथे रिक्षामध्ये बसल्याचं सांगितलं. त्यानंतर मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली. पोलिसांना रिक्षात रक्ताचे डागही आढळून आले. रिक्षाचालकासह तीन अन्य रिक्षाचालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रिक्षामध्ये आढळलेल्या रक्ताच्या नमुन्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.