(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिन्नरला एकाच रात्री तीन घरफोड्या, 22 तोळं सोनं, 70 हजारांची रोकड लंपास
Nashik News : सिन्नर येथील सरदवाडी रोडवरील शांतीनगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून लाखोंचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे.
Nashik Sinnar News नाशिक : सिन्नर (Sinnar) येथील सरदवाडी रोडवरील शांतीनगरमध्ये (Shantinagar) अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून लाखोंचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घरफोड्यांमध्ये (Robbery) 22 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि 70 हजारांची रोकड चोरांनी लंपास केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिता रविंद्र सहाने (37) (Sunita Sahane) या शांतीनगर परिसरातील इरा शाळेसमोर रो हाऊसमध्ये राहतात. त्यांच्या घराशेजारीच त्यांचे भाऊ रत्नाकर तुकाराम डावरे, अमोल डावरे यांचे घर आहे. अमोल हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तर त्यांची पत्नीही माहेरी गेली असल्याने त्यांच्या घराच्या तळमजल्याला कुलूप लावून त्यांची आई, भाऊ वरच्या मजल्यावर झोपले होते. तसेच सुनिता यादेखील आपल्या घराला कुलूप लावून आईसोबत झोपल्या होत्या. सुनिता या सकाळी झोपेतून उठून खाली आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरामध्ये जाऊन बघितले असता किचनमध्ये ठेवलेले लोखंडी गोदरेज कपाट तुटलेले दिसून आले.
एकाच रात्री तीन घरफोड्या
कपाटातील सर्व कपडे व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील सुटकेसमध्ये ठेवलेल्या त्यांचे तब्बल 15 तोळ्याचे सोन्याचे दागिने व पर्समध्ये ठेवलेली 30 हजारांची रोकडही गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ आई जिजाबाई यांना खाली बोलावले असता त्यांना सुनीता यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या अमोल यांच्याही घराचा दरवाजा उघडा दिसला.
जिजाबाई यांनी अमोल यांच्या घरात जाऊन बघितले असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यावर त्यांनी तात्काळ माजी नगरसेवक पंकज मोरे यांना फोन करून माहिती दिली. अमोल यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व फोमच्या खुर्चीच्या कप्प्यात ठेवलेले पैसे चोरी गेल्याने दिसून आले. यानंतर यशवंतनगर येथील विद्या दिपक गोफणे यांच्याही घरी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या घरातीलही सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. मोरे यांनी याबाबत पोलीसांना कळवताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत पाहणी केली. पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण केले.
22 तोळे सोन्याचे दागिने, 70 हजारांची रोकड लंपास
या चोरीत सुनिता यांच्या घरातून 30 हजारांची रोकड, 5 तोळे 3 ग्रॅमचे सोन्याचे गंठन, 2 तोळे 1 ग्रॅमची शॉर्ट पोत, 4 तोळे 4 ग्रॅमचे मंगळसुत्र पेंडल व 1 तोळे 5 ग्रॅमची चैन, 2 तोळ्याची बाळी, साडेसहा तोळ्याचे सोन्याचे वेल, 15 ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, 12 ग्रॅमच्या तीन अंगठ्या, 100 ग्रॅम चांदीच्या पैंजनाचे दोन जोड, पायातील गोफ, हातातील कडे, कमरेची चैन, गळ्यातील सरी, एक चैन, दोन बाजुबंद चोरी गेले आहेत.
डावरे यांच्या घरातून 25 ग्रॅमची पट्टीपोत, कानातील सोन्याचे टॉप्स, 15 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, 18 ग्रॅमची पोत व 40 हजारांची रोकड गेली. तर दिव्या गोफणे यांच्या 6 ग्रॅमच्या तीन अंगठया व 4 ग्रॅमचे ओमपान, 2 ग्रॅमचे कानातील टॉप्स चोरट्यांनी लंपास केले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
जिल्ह्यातून दुचाकीची चोरणारी टोळी जेरबंद; सात जण ताब्यात, 13 मोटारसायकल हस्तगत