(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PUBG खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातून 10 लाख खर्च, भीतीने घर सोडलं, अंधेरीतील अल्पवयीन मुलाचं कृत्य
PUBG खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च करून 16 वर्षाच्या मुलाने घर सोडलं. एवढंच नाही तर यानंतर हा मुलगा घर सोडून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई : मुलं मोबाईलच्या आहारी गेल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. त्यात पब्जी या गेमचं व्यसन खूप वाढत आहे. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आहे. PUBG खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च करून 16 वर्षाच्या मुलाने घर सोडलं. एवढंच नाही तर यानंतर हा मुलगा घर सोडून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील अल्पवयीन मुलानं हे कृत्य केलं आहे. मुंबईत अंधेरी पूर्वेत एक 16 वर्षीय मुलगा घरातून पळून गेला कारण त्याच्या पालकांनी त्याला PUBG खेळण्यासाठी ऑनलाइन व्यवहारातून 10 लाख रुपये खर्च केल्याबद्दल फटकारले होते. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली केव्ह्स परिसरात पळून गेलेल्या मुलाचा शोध घेतला आणि त्याला त्याच्या पालकांकडे परत पाठवले.
ही घटना बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली. मुलाच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली होती. तपासादरम्यान मुलाच्या पालकांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचा 16 वर्षाचा मुलगा गेल्या दीड महिन्यापासून PUBG गेमच्या आहारी गेला होता. मोबाईलवर गेम खेळत असताना त्याने त्याच्या आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च करून आयडी आणि चालान मिळवलं होतं.
जेव्हा पालकांना ऑनलाईन व्यवहाराबद्दल कळले तेव्हा त्यांनी मुलाला रागावले होते. त्यानंतर मुलाने पत्र लिहून घर सोडले. त्या पत्रामध्ये मुलाने लिहिले होते की, मी आईच्या अकाउंट मधून पब्जी गेम खेळण्यासाठी दहा लाख रुपये उडवले. त्यामुळे मला ते रागावतील. यासाठी मी घर सोडून जात आहे. मी आईचे गमावलेले दहा लाख रुपये पुन्हा कमवून दिल्यानंतर पुन्हा घरी येणार असल्याचे पत्रामध्ये लिहिले होते.
याच माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील माळगावी यांनी 24 तासाच्या आत मुलाला शोधले. एमआयडीसी केव्हस रोड परिसरात राहत असलेला त्याच्या मित्राच्या घरातून मुलाला शोधण्यात पोलिस यशस्वी झाले. मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्याच्या पालकांकडे परत पाठवण्यात आले.