(Source: ECI/ABP News/ABP Majha)
... अन्यथा माझा मुडदा पाडेल, EVM वरुन निवडणूक आयुक्तांना धमकीवजा पत्र; माजी मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल
ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करुन काही फेरबदल केला तर मी मुख्य निवडणूक आयुक्तांचा खूनही करेल असं खळबळजनक पत्र
बुलडाणा : लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. मोठ्या उत्साहात व जल्लोषात वादाचा किरकोळ अपवाद वगळता यंदाची निवडणूक (Election) पार पडली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमेवरुन सातत्याने प्रश्नचिन्ह उमटले. विरोधकांनी निवडणूक आयोग हा सरकारच्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याचा आरोपही अनेकदा केला. तर, मतदानानंतरही ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामात सीसीटीव्ही बंद असल्यावरुन काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यातच, माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना (Election commission) पत्र लिहून खळबळजनक विधान केलं आहे. महाराष्ट्रातील मतदारांच्यावतीने (Voter) अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच सावजी यांनी पत्रातून दिला आहे.
ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करुन काही फेरबदल केला तर मी मुख्य निवडणूक आयुक्तांचा खूनही करेल असं खळबळजनक पत्र लिहून मुख्य निवडणूक आयुक्तांना सावजी यांनी थेट धमकी दिल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी, माजी मंत्री सुबोध सावजी यांच्यावर बुलढाण्यातील डोनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून ईव्हीएम मशीन बद्दल काळजी व्यक्त केली होती. तसेच, त्यात फेरबदल केल्यास मी तुमचा मुडदा पाडण्यासही मागे पाहणार नाही.. अशा शब्दात थेट धमकीची भाषा पत्रात वापरली होती. माजी मंत्र्यांच्या या पत्राची गंभीर दखल घेत पोलिसांनी सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सुबोध भावे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावे पत्र
भारतात झालेल्या वर्ष 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदाराचा कौल हा महाविकास आघाडी पक्षाकडेच आहे, या आधारे एकुण 48 जागापैंकी 38 ते 40 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीच्या येणारचं आहेत. परंतु ,जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की, आपण ई.व्ही.एम. मशिनमध्ये घोटाळा करुन लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहातं. पण, असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्यावतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही.
माझे वय सध्या 80 वर्षाचे आहे, आता 10 किंवा 20 वर्षे मला जगायचे आहे. माझ्या डोळयादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पध्दतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड- उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही. लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेल. अशी चेतावणी देत आहे.
असे पत्रच सुबोध सावजी यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.
गुन्हा दाखल
दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशान्वये सुबोध सावजी यांच्याविरुद्ध 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्या आल्याचे डोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर नागरे यांनी सांगितले.