"शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा" ; मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र
Sheena Bora Murder Case : शीना बोरा जिवंत असून तिला काश्मीरमध्ये एका महिलेनं पाहिलंय, असा दावा तिची आई आणि हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीनं केला आहे.
Sheena Bora Murder Case : देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिची आई इंद्राणी मुखर्जीनं केला आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला लिहिलेल्या एका पत्रातून केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. शीना बोरा जिवंत असून तिला काश्मीरमध्ये एका महिलेनं पाहिलंय, असा दावा तिची आई आणि हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीनं केला आहे. भायखळा कारागृहात कैद असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला पत्र लिहिलं असून शीनाचा काश्मीरमध्ये तपास करण्याची विनंती इंद्राणी मुखर्जीनं केली आहे.
पत्रासोबतच इंद्राणीने विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात 2015 पासून शीनाची आई आणि मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) भायखळा जेलमध्ये आहे. गेल्याच महिन्यात मुंबई हायकोर्टानं इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर इंद्राणी सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती.
2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह'