Santosh Deshmukh Murder Case: काही वेळात तुमच्या भावाला सोडतो, विष्णू चाटे धनंजय देशमुखांना काय म्हणाला होता?, जबाबात धक्कादायक माहिती समोर
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख प्रकरणी आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता तिसरी सुनावणी होणार आहे.

Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची निर्घृण हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता तिसरी सुनावणी होणार आहे. आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहून न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करणार करणार आहेत.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात 26 मार्चला झालेल्या दुसऱ्या सुनावणीत बीड जिल्हा सत्र न्यायालयात उज्वल निकम यांनी न्यायालयाने आरोपीवर चार्ज फ्रेम करावा याबाबत तिसऱ्या सुनावणीत विनंती अर्ज देणार असल्याचे सांगितले होते. आरोपींपैकी वाल्मिक कराड, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे हे 6 आरोपी बीड जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत, तर कृष्णा आंधळे हा फरार आहे. आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूरच्या कारागृहात आहे.
धनंजय देशमुख यांचा जबाब "एबीपी माझा" च्या हाती, काय काय म्हटलंय?
- 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा एनर्जी प्रकल्पावर झालेल्या मारहाणीची माहिती धनंजय देशमुख यांना त्यांच्या सहकारी मित्रांनी दिली.
- प्रकल्पावर पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख यांनी सरपंच देशमुख यांना विचारणा केली त्यावेळी त्यांनी वाल्मिक कराडची माणसे आवादा कंपनीत लोकांना दम देऊन खंडणी मागत असल्याचे त्यांनी सांगितले.
- 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्याच दिवशी संतोष देशमुख यांनी धनंजय देशमुख यांना खंडणीच्या आड येऊ नको म्हणत जीवे मारण्याची धमकी विष्णू चाटे ने दिली होती असं संतोष देशमुख यांनी सांगितलं होतं. याची माहिती विचारण्यासाठी धनंजय देशमुख यांनी सुरुवातीला वाल्मिक कराडला फोन लावला मात्र तो फोन व्यस्त लागला होता.
- वाल्मिक कराड नंतर धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला फोन करून सरपंच देशमुख यांना आणून देण्याची विनंती केली. त्यावर मी काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असे विष्णू चाटेने धनंजय देशमुख यांना सांगितले.
- ही संपूर्ण घटना घडल्यानंतर धनंजय देशमुख आपल्या सहकाऱ्यांसोबत केज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. हा संपूर्ण जबाब धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेला दिला आहे.
संतोष देशमुख प्रकरणाच्या सुनावणीत आतापर्यंत काय काय घडलं?
खटल्याचा घटनाक्रम- पहिली सुनावणी:
केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात 12 मार्चला पहिली सुनावणी झाली. बचाव पक्षाने डिजिटल पुरावे, सीडीआर, आरोपींचे जबाब देण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारी वकिलांनी पुढील सुनावणीत पुरावे देऊ असे सांगितले.
दुसरी सुनावणी:
26 मार्चला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करत कराड याने इतर आरोपींना गाइड केल्याचे सांगितले. कराडचे वकील विकास खाडे यांनी सीडीआर, फुटेज, कागदपत्रांची मागणी केली. त्यानुसार कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले.
























