छ. शिवाजी महाराजांनी जो न्याय दिला असता, तसाच न्याय देशमुख कुटुंबाला मिळेल, योगेश कदम यांचा मस्साजोगमध्ये शब्द!
योगेश कदम पहिल्यांदाच मस्साजोग गावात गेल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती गृहराज्यमंत्र्यांना दिली. आरोपीची गाडी वाशीकडे जात असताना ही माहिती पोलिसांना सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले गेले.

बीड : जिल्ह्यातील संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली असून देखील अद्याप आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडला नाही. तर, दुसरीकडे आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची पोलिसांकडून बडखास्त केली जात असल्याचा आरोप देशमुख कुटुबीयांकडून व आमदार सुरेश धस यांच्याकडून होत आहे. त्यामुळे, याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही केली जात आहे. त्यातच, आज गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी, धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी यांनी योगेश कदम यांच्याशी चर्चा करत काही महत्त्वाची माहिती दिली. तसेच, संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा अद्यापही हस्तक्षेप असल्याचं गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
योगेश कदम पहिल्यांदाच मस्साजोग गावात गेल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती गृहराज्यमंत्र्यांना दिली. आरोपीची गाडी वाशीकडे जात असताना ही माहिती पोलिसांना सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले गेले. वाशी पोलीस स्टेशनचे पी.आय आणि केजचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सह आरोपी केले पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर, अंबाजोगाई च्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करा असे सूचना योगेश कदम दिल्या असून ज्यांच्यावर शंका आहे त्यां अधिकाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने देखील शंका असलेल्यांना सह आरोपी करण्याची मागणी कदम यांच्याकडे केली आहे. त्यावर, ज्यांनी सहकार्य केले त्यांना कडक शिक्षा होणार असे आश्वासन कदम यांनी दिले. देशमुख प्रकरणातील सगळ्या आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दुसऱ्या तालुक्यातील लोक इथं येऊन दहशत माजवत असतील तर त्यांना डायरेक्ट आत मध्ये टाका, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानेच आज इथे आलो आहे. शिंदे साहेबांचं या प्रकरणावर लक्ष आहे, शिंदेसाहेब देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी आहेत हा संदेश घेऊनच मी इथे आलो आहे, असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे, या आरोपींनी पुन्हा असं क्रूर कर्म नाही केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे. जेलमधील आरोपी गळ्यात गमछा घालत आहे. जसा मी इथे आहे, तसेच आरोपी जेलमध्ये आहेत, असे धनंजय देशमुख यांनी गृहराज्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर, ज्या कर्मचाऱ्यावर कुटुंबाला शंका आहे, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे कदम यांनी म्हटले.
शिवाजी महाराजांच्या काळाप्रमाणेच न्याय होईल
दरम्यान, या प्रकरणाबाबत मी शिंदे साहेबांसोबत चर्चा करणार आहे, माझ्या स्तरावरचे आदेश तर मी दिलेच आहेत. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशी झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो न्याय दिला, जायचा तसाच न्याय दिला जाईल, असेही गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.
मुख्य आरोपींचे इतरत्र स्थलांतरण
मुख्य आरोपींना इतरत्र स्थलांतरित करणे हे कुटुंबांची मागणी आहे ही रास्त आहे, मी ही बाब मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे. जेल प्रशासनाच्या प्रमुखांशी मी चर्चा करणार आहे. केस लूज होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे, अशा सूचना मी दिल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांवर आरोप आहेत त्यांना समज देऊन चालणार नाही, त्यांना बडतर्फ केले पाहिजे. पोलीस प्रशासनाचे काम काय आहे हे लक्षात आणून देणं आमचं काम आहे, असे पत्रकारांशी बोलताना योगेश कदम यांनी म्हटले.
हेही वाचा
शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्य, कायदा होणार, तारीख ठरली; गृहमंत्री अमित शाह रायगडावरुन घोषणा करणार
























