Sangli Crime : दोन पोलिसांच्या घरात भरदिवसा चोरी, आठ तोळे दागिने पळवले
Sangli Crime : सांगलीत चोरांची हिंमत इतकी वाढली आहे की त्यांनी थेट पोलिसांच्या घरात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एकाच अपार्टमेंटमधील दोन पोलिसांचे बंद फ्लॅट फोडून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पोबारा केला.
Sangli Crime : सांगली (Sangli) जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. आता तर चोरांची हिंमत इतकी वाढली आहे की त्यांनी थेट पोलिसांच्या घरात चोरी (Robbery at police house) केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एकाच अपार्टमेंटमधील दोन पोलिसांचे बंद फ्लॅट फोडून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पोबारा केला. दोन फ्लॅटमधील आठ तोळे सोने आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
कुपवाड रोडवरील कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये काल (27 जुलै) दुपारी एकच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे संदीप मोरे आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पूजा खाडे यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. या दोन्ही चोरीची संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
संदीप मोरे हे ड्युटीवर पोलीस ठाण्यात असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेऊन मोरे यांचा पहिल्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सहा तोळे सोने आणि तीन हजार रोख रुपये चोरले. त्यानंतर चोरट्यांनी त्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या पूजा खाडे यांच्या घराचे लॉक तोडत घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहे.
एकीकडे पोलिसांच्याच घरी चोऱ्या होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा सवाल सांगलीकर उपस्थित करत आहेत. दरम्यान, या चोरीनंतर सांगली जिल्ह्यात आधीपासूनच ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे निघत आहेत.
अकोल्यात आठ दिवसांपूर्वी पोलिसासह सैनिकाच्या घरी चोरी
तिकडे आठ दिवसांपूर्वी अकोल्यातही एका सैनिक आणि पोलिसाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला होता. अकोला शहरातील गीतानगर भागात असलेल्या भानू अपार्टमेंटला चोरट्यांनी लक्ष केलं. या अपार्टमेंटमधील एका सैनिक आणि पोलिसाच्या घरात चोरट्यांनी चोरी केली. विजय त्र्यंबक गोपनारायण यांच्या घरातील कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने आणि तीन ते चार हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केली. तर सुभाष दंदी या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून जवळपास तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला. चोरीच्या वेळी पोलीस कर्मचारी आणि चोरट्यांमध्ये धक्काबुक्की झाली. परंतु चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत पळ काढला. हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजतं.