Akola : अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ, दिवसाढवळ्या पोलिसाच्या घरी चोरी, चाकूचा धाक दाखवत पळ काढला
Akola Crime : अकोल्यात तीन चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी करत चक्क पाच लाखांवर मुद्देमाल लंपास केला आहे.
अकोला : आज बुधवारी अकोला शहरात तीन चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. शहरातील गीतानगर भागात असलेल्या भानू अपार्टमेंटला चोरट्यांनी लक्ष केले. या अपार्टमेंटमध्ये तब्बल दोन घरात चोरट्यांनी चोऱ्या केल्या. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरीही चोरी झाली. पण पोलिसांच्या घरात चोरटे चोरी करत असताना या कर्मचाऱ्यांची त्यांच्यासोबत हातापायी झाली. दरम्यान, चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत पळ काढला. हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजते. भरदिवसा चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झालाय.
अकोला शहरातील गीतानगरातील भानू अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंट मध्ये चोरट्यांनी दोन घरांना लक्ष केले. यामध्ये विजय त्र्यंबक गोपनारायण यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली. गोपनारायण हे सैनिक असून राजस्थान येथे कार्यरत आहेत. त्यांच्या घरी त्यांची पत्नी ज्योती आणि दोन मुली राहतात. दरम्यान, आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्या दोन्ही मुली शिकवणी वर्गाला आणि ज्योती हे भाजी बाजारात गेल्या होत्या आणि साडेपाच वाजता परतल्यात. या एका तासात चोरट्यांनी त्यांच्या दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने आणि तीन ते चार हजार रुपये रोख लंपास केला अशी माहिती ज्योती गोपनारायण यांनी 'माझा'शी बोलताना दिली.
पोलीस अन् चोरट्यांमध्ये हातापायी
याच अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणारे सुभाष दंदी हे पोलीस कर्मचारी असून त्यांची ड्युटी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आहे. दरम्यान, दंदी आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास घरी परतले असतांना त्यांना त्यांच्या घरात तीन चोरटे दिसून आलेत. त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत पळ काढलाय. या दरम्यान दंदीची घरात आणि खाली रस्त्यावर चोरट्यांमध्ये हातापायी झाली. त्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरड केली असता, नागरिक जमा झाले. मात्र तोपर्यंत त्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत पळ काढला. दंदी यांच्या घरात सुमारे तीन लाखाच्या जवळपास मुद्देमाल चोरी झाल्याचं समजते.
चार चाकी वाहनात आले होते चोरटे
आज चोरटे हे चारचाकी वाहनाने सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गीतानगरात आले अन् त्यांनी या भागाचे बारकाइने पाहणी केली. साडेचारच्या सुमारास या भानू अपार्टमेंटला टारगेट केलं. या चोरट्यांमध्ये तीन जणांचा समावेश असून तिन्ही चोरटे शरीराने चांगले तंदुरुस्त होते. दरम्यान, पोलिसांनी या परिसराची सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता चोरटे हे स्विफ्ट डिझायर या वाहनात आले.
तिनेही चोरटे 'नाशिक'चे
दरम्यान, आज अकोल्यात धुमाकूळ घालणारे हे तिन्ही चोरटे नाशिक जिल्ह्यातील असल्याचा समजते. दंदी आणि त्यांच्यामध्ये झालेल्या हातापायी दरम्यान चोरट्यांची काही साहित्य आणि अवजारे घटनास्थळावरच पडले. पोलिसांनी अवजारे सध्या जप्त केले आहेत. यामध्ये एका चोरटयाची बॅगही आहे. या बॅगमध्ये आढ़ळलेल्या काही पुराव्यानंतर हे चोरटे नाशिकचे असल्याचं दिसून आहे. सध्या त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी 'माझा'शी बोलतांना दिली.
आजचा चोरीचा प्रकार अकोला पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा
भर दिवसा हे चोरीचा प्रकार घडल्याने कुठेतरी पोलिसांची पेट्रोलिंग वाढवण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. आता चोरटे खुलेआम चाकूचा धाक दाखवत चोरी करत आहेत, आम्ही महिला आणि मुली फक्त दिवसा घरात राहतो, अन् आमच्या घरचे पुरुष ड्युटीवर असतात. आजचा चोरीचा प्रकार हां अत्यंत भयंकर होता, पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षापणामुळे या चोरीच्या घटना घडल्या आहे, असा आरोप अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या स्थानिक महिला दीपिका गवई यांनी केला आहे. आता तरी पोलिसांनी गस्ती वाढवावी, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली आहे.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट
या चोरीच्या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी, एलसीबीचे पोलीस अधिकारी, पोलिसांचे विशेष पथक आणि शहरातील इतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी भेट दिली. आता पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे आणि त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, गीतानगर भागात शहरातील अनेक पोलिसांचं निवासस्थान आहे. इथं शहरातील मुख्य अधिकारी आणि पोलीस कर्मचारी राहतात. आता हा चोरीचा प्रकार याच परिसरात घडल्याने अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभा राहिला आहे.