गुन्ह्यातील गाडी सोडणं अन् 25 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलीस 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
Sangli Crime News : गुन्ह्यातील गाडी सोडणं आणि तपासात मदत करण्यावरून 25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना लाचलुचपत विभागानं ताब्यात घेतलं आहे.
Sangli Crime News : एका अपघाताच्या गुन्ह्यातील गाडी सोडणं अन् तपासात मदत करण्यावरून 25 हजारांची लाच मागणारे पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत. सांगली जिल्हा पोलीस दलातील जत पोलीस ठाण्यातील हे दोघेजण पोलीस कर्मचारी आहेत. गणेश ईश्वरा बागडी आणि संभाजी मारुती करांडे अशी लाचखोर पोलिसांची नावं आहेत. सांगलीच्या (Sangli) लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे.
जत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल असलेल्या भावाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि या अपघातात जप्त असलेली मोटरसायकल सोडण्यासाठी दोन पोलिसांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. संबंधित तक्रारदार यांच्या भावावर जत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या अपघात प्रकरणी संबंधिताची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात संबंधिताला मदत करण्यासाठी आणि जप्त केलेली मोटरसायकल सोडवण्यासाठी गणेश ईश्वरा बागडी यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितली होती. याबाबत संबंधितानं बागडी यांच्याविरोधात सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं दोन दिवस बागडी आणि कारंडे यांची सापळा लावून चौकशी करण्यात आली. यामध्ये लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर आज संबंधित तक्रारदाराला 25 हजार रुपये घेऊन जत पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं. यावेळी संभाजी कारंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. याचवेळी लाचलुचपतच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडलं.
या प्रकरणी गणेश बागडी आणि संभाजी कारंडे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, अविनाश सागर, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, संजय सपकाळ, रवींद्र धुमाळ, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, राधिका माने यांच्या पथकानं केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :