Sangli Crime : सांगलीत गोवा स्टाईल कॅसिनो आणि लॉटरी सेंटरच्या संघर्षातून गँगवॉर, महागडे संगणक, यंत्रे जमिनीवर आपटून फोडली
Sangli Crime : सांगलीत संघर्ष मार्केटमध्ये मुळातच परवानगी नसलेल्या पण बिनधास्तपणे चालू केलेल्या गोवा स्टाईल कॅसीनो सेंटर आणि लॉटरी सेंटरच्या संघर्षातून गँगवॉर झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Sangli Crime : सांगली पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयापासून अवघे १०० मीटर अंतरावर असलेल्या संघर्ष मार्केटमध्ये मुळातच परवानगी नसलेल्या पण बिनधास्तपणे चालू केलेल्या गोवा स्टाईल कॅसीनो सेंटर आणि लॉटरी सेंटरच्या संघर्षातून गँगवॉर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील एका गटाने दुसऱ्या दुकानातील संगणक, लॉटरीचे साहित्य, टेबलाची नासधूस केली. स्टेशन चौकातील या प्रकाराने नागरिक, विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सांगलीच्या पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयाजवळील स्टेशन चौकात महापालिकेने खोक्यांचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी गणेश मार्केट व संघर्ष मार्केट उभे केलं आहे यातील संघर्ष मार्केटमध्ये अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे.
या परिसरात अवैध कॅसिनोही चालविले जातात ज्याला मान्यता नाही. तेथील दोन दुकानदारांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातून पूर्वीही भांडणे झाली होती. गुरुवारी सायंकाळी या वादाचे पर्यावसान जोरदार संघर्षात झाले. एका गटाच्या टोळीने दुसऱ्याच्या दुकानाची नासधूस केली. महागडे संगणक, यंत्रे जमिनीवर आपटून फोडली. तेथून जीव वाचवून मालकाने धूम ठोकली. हा राडा झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सांगली शहर पोलिसांनी येथे पाहणी केली, मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल नाही.
अवैध धंद्याबद्दलची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे
भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबत आवाज उठवला आहे. पवार यांनी हे धंदे बंद करा, असा इशारा दिला होता. त्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पोलिस यंत्रणेला कसिनो, ऑनलाईन लॉटरी मोडून काढा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता. त्याला दोनच दिवस उलटले आहेत.
या राड्याबद्दलचे आणि जिल्ह्यातील एकूणच अवैध धंद्याबाबतचे व्हिडिओ थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले जात आहेत. सांगलीच्या पोलिसिंगचा आणि इथल्या कायदा सुव्यवस्थेचा कसा बाजार मांडला आहे, याचा पंचनामा आपण करणार असल्याचे पृथ्वीराज पवार यांनी म्हटले आहे. कॅसिनो हटाओ, सांगली बचाओ’, हा नारा त्यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या