Nagpur Crime : पायावर लोटांगण घेत माफी मागण्यास भाग; दहशतीसाठी व्हिडीओ व्हायरल
Nagpur Crime : पायावर लोटांगण घेत माफी मागण्यास भाग; दहशतीसाठी व्हिडीओ व्हायरल
राज्याची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या नागपुरात (Nagpur) नेमकं चाललंय काय? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. नागपुरात एका पेट्रोल पंप चालक महिलेला धक्काबुक्की करण्यात आली आहे. क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी पाहायला मिळाली. वाद फारच विकोपाला गेला आणि त्यानंतर पेट्रोलपंप चालक महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागण्यास टोळक्यानं भाग पाडलं. टोळकं एवढ्यावर थांबलं नाही, तर त्यांनी त्यानंतर या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. नागपुरात पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादानंतर टवाळखोर तरुणांच्या जमावानं पेट्रोल पंप चालवणाऱ्या 44 वर्षीय महिलेला तरुणांच्या पायावर लोटांगण घालून सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पाडलं. त्यानंतर तिच्या माफिचे ते व्हिडीओ परिसरात तिची बदनामी करत आपली दादागिरी प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टानं व्हायरल केले. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन जणांना अटक केली आहे. प्रकरण नेमकं काय? 18 डिसेंबरच्या रात्री दहा वाजता नागपूर हिंगणा रोडवरील इलेक्ट्रिक झोन चौकावर पीडित महिला सुचित्रा लोहकरे आपल्या पेट्रोल पंपावर उपस्थित होती. त्यावेळी एका बाईकवर आलेल्या दोन तरुण पेट्रोल पंपावर काम नसताना इकडे तिकडे फिरू लागले. त्यामुळे पेट्रोल पंप संचालिका सुचित्रा लोहकरे यांनी त्यांना हटकलं. या मुद्द्यावर दोन्ही तरुणांचा सुचित्रासोबत शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की सुद्धा झाली. थोड्यावेळानंतर वाद घालणारे तरुण परिसरातील आपल्या गुंड प्रवृत्तीच्या इतर सहकाऱ्यांना घेऊन आले. रात्री दहा वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावर आलेल्या या जमावानं जोरदार गोंधळ तर घातलाच. सोबतच इलेक्ट्रिक झोन चौकावर आमची दादागिरी चालते, इथे एवढा मोठा कोण झाला आहे? जो आमच्या सहकाऱ्यांना दमदाटी करेल, असं सांगत सुचित्रा लोहकरे यांनी माफी मागावी असा दबाव आणला.