(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बडतर्फ पोलिसाला अटक, कुपवाड पोलिसांची कारवाई
Sangli Crime : सांगलीतील कुपवाड पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बडतर्फ पोलिसाला अटक केली आहे. पुण्यातील शेतकऱ्यांकडून एक कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्यावर बडतर्फीची कारवाई झाली होती.
Sangli Crime : अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अत्याचार करणाऱ्या कोल्हापुरातील बडतर्फ पोलिसाला (Police) अटक करण्यात आली आहे. सांगलीतील (Sangli) कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. कर्नाटकातील हुबळी इथून त्याला बेड्या ठोकण्यात आला. पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील शेतकऱ्याकडे एक कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितल्याप्रकरणी या पोलीस शिपायावर बडतर्फीची कारवाई झाली होती. जॉन वसंत तिवडे (वय 40, सध्या रा. कदमवाडी, ता. शाहूवाडी, मूळगाव कोरोची, जि. कोल्हापूर) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे
2020 मध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन अत्याचार
जॉन तिवडे याच्याविरुद्ध 19 सप्टेंबर 2020 रोजी अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो दोन वर्षांपासून फरारी होता. तपासादरम्यान पीडित मुलीची सुटका झाली. कुपवाड पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने संशयित तिवडे याने कुपवाड शहरातील आंबा चौक आणि कसबा बावडा (कोल्हापूर) इथे नेऊन अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर जॉन तिवडे याच्याविरुद्ध कुपवाड पोलिसांनी 18 मे 2022 रोजी बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता.
शेतकऱ्याकडून एक कोटी रुपयांची लाचेची मागणी
दरम्यान, देहूरोड (पुणे) येथील शेतकऱ्याकडून जमिनीच्या वादाचा निकाल बाजूने लावून देण्याच्या आमिषाने एक कोटीची लाच उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी होता. शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिवडेविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली होती. संशयित तिवडेने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर तो फरारी झाला होता. तो कर्नाटकात असल्याची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी हुबळी येथे सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.