माझ्या नराधम बापाला फाशी द्या; पतीच्या मृत्यूनंतर विद्याने फोडला टाहो, संभाजीनगरच्या घटनेनं हादरलं समाजमन
मुलीच्या लग्नाची हळदही नीटशी निघाली नसेल तोवरच बापानं आपल्या सख्ख्या मुलीचं कुंकू पुसलं.
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. आंतरधर्मीय प्रेमविवाह (Marriage) केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्या केली. बापानेच जातिभेदापोटी मुलीचं कुंकू पुसलं. पण, पतीच्या निधनाने मुलीने टाहो फोडला असून माझ्या निर्दयी बापाला फाशी द्या, अशा शब्दात मुलीने संताप व्यक्त केला आहे. संभाजीनगरच्या (Sambhajinagar) इंदिरानगर भागातील या घटनेनं महाराष्ट्र हादरला असून मृत्यू झालेल्या अमितच्या कुटुंबीयांनीही टाहो फोडत मुलाच मृतदेह पोलीस (Police) स्टेशनमध्ये ठेवला होता. आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही, असा संताप व्यक्त केला होता. दरम्यान, अमितवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, 12 व्या दिवशी त्याने अखेरचा श्वास घेतला.
मुलीच्या लग्नाची हळदही नीटशी निघाली नसेल तोवरच बापानं आपल्या सख्ख्या मुलीचं कुंकू पुसलं. कारण एकच, मुलीने आंतरधर्मीय विवाह केला होता. छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगरमधील ही घटना आहे. विद्या ही गोंधळी समाजाची तर अमित साळुंके हा बौद्ध समाजाचा मुलगा, दोघेही बालपणापासूनचे मित्र. मात्र, तरुणवयात दोघांमध्ये प्रेम झालं, त्यांनी विवाह केला पण वडील गीताराम किर्तीशाही यांना हे लग्न मान्य नव्हते, त्यांनी आणि त्याचा पुतण्या आप्पासाहेब यांनी घरासमोर पब्जी खेळत बसलेल्या अमितवर चाकूने सपासप वार केले. सासऱ्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला होता, पोट आणि छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी अमितचा घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरील घटनेत शहरातील जव्हार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरुवातीला 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, मात्र मुलाच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपी वडील गीताराम आणि आप्पासाहेब यांना मदत करणाऱ्या एकाला अटक केली आहे. मात्र, अमितवर करण्यात आलेले वार एवढे गंभीर की आतडे बाहेर आले, माझ्या नराधम बापाला फाशीची शिक्षा द्या, असे म्हणत मुलीने पतीच्या निधनावर आक्रोश व्यक्त केलाय.
दरम्यान, आपल्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना व चुलता भावाच्या डोक्यात होता. याच रागातून विद्याचे वडील आणि तिच्या चुलत भावाने 14 जुलै रोजी अमितवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित खाली कोसळला, त्याच्या पोटात खोलवर वार घुसल्यामुळे तेव्हापासूनच त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र, 12 दिवसानंतर अमितशी मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला.