(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझी बायको होशील का? 14 वर्षीय मुलाचे 13 वर्षीय मुलीसाठी स्टेटस, पुण्यातील प्रकार
Pune News Update : आपल्याच वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीसाठी 14 वर्षाच्या मुलाने माझी बायको होशील का? असा स्टेटस ठेवल्याचे समोर आले आहे. पुण्यातील या प्रकारानंतर संबंधित मुलावर गुन्हा दाखल झालाय.
Pune News Update : एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गात शिकणऱ्या मुलीसाठी "माझी बायको होशील का?" असा स्टेटस इंस्टाग्रामवर ठेवला. परंतु, असा स्टेटस ठेवणे या मुलाला चांगलेच महागात पडले आहे. या स्टेटसनंतर मुलीच्या आईने थेट पोलिस ठाणे गाठले. हा सगळा प्रकार घडला आहे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात. आता या प्रकरणामुळे 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडील काही काळामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अनेक वेळा याच सोशल मीडियावरून अनेक अपराध देखील घडले आहेत. असाच एक प्रकार शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून समोर येतोय. एका 14 वर्षीय मुलाने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीला इंस्टाग्रामवरुन तिचा फोटो टाकून माझी बायको होशील का? असा स्टेटसच ठेवला आणि तो व्हायरल देखील केला. हा सगळा प्रकार जेव्हा त्या मुलीला कळाला तेव्हा तिने त्या मुलाची तक्रार आईकडे केली. हां संपूर्ण प्रकार पाहून आईने थेट पोलिसात धाव घेतली आणि संबंधित मुलाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पुण्यातील हडपसर भागात एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या या 14 वर्षीय मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही एकाच शाळेत शिकायला असल्याने यातील मुलाने अनेक वेळा त्या मुलीकडे मैत्रीची मागणी केली होती. काही दिवसांपासून हा मुलगा त्या मुलीचा पाठलाग करीत असे. तसेच मैत्री करण्यासाठी तिला वारंवार धमक्या द्यायचा. माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईन अशी धमकी देखील त्याने या मुलीला दिली होती. त्या मुलीने मात्र काहीच उत्तर न दिल्यामुळे त्याने तिचा फोटो घेऊन "माझी बायको होशील का" असे स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे.
हा सगळा प्रकार अल्पवयीन मुलांच्याबद्दल होत असल्याने पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंर संबंधित मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कारवाई देखील करतील. मात्र येणारा काळ हा तरुण पिढीसाठी भयाव आहे. हे या जिवंत उदाहरणातून समोर येतोय. ज्या वयात हातात पुस्तक हवीत आता मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत. जे वय काहीतरी नवीन शिकण्याचं किंवा मैदानावर जाऊन खेळण्याचा आहे, त्या वयात ही सगळी मंडळी सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत.
पालकांनी आपल्या पाल्यावर जर वेळीच लक्ष दिले नाही तर हातात अभ्यासाचे पुस्तक नाही तर पोलिसांच्या बेड्या ठोकल्या जातील हे मात्र कटू सत्य आहे, त्यामुळे मुलांनी आणि पालकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.