Nilesh Ghaywal : फेसबुक, इन्स्टाग्रामवर दहशत माजवणारे व्हिडीओ टाकले, निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल
Nilesh Ghaywal News : सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन देण्यााचा आरोप गुंड निलेश घायवळवर ठेवण्यात आला आहे.

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडीओ पोस्ट केल्याबद्दल त्याच्यावर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या घायवळचा पाय आणखी खोलात गेला आहे.
इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर भीतीदायक रील्स आणि पोस्ट टाकत दहशत पसरवल्याप्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन देणे आणि चिथावणी देत दहशत माजवणे असा त्याच्यावर आरोप आहे.
गुंड निलेश घायवळ खोटा पासपोर्ट काढून लंडनला फरार झाला आहे. तर त्याचा भाऊ सचिन घायवळवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन घायवळ हा देखील फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.
Nilesh Ghaywal News : दुकानदाराला धमकावून सीम कार्ड मिळवलं
निलेश घायवळवर आणखी एक गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुण्याच्या कोथरुडमध्ये एका मोबाईल दुकानदाराला धमकावून त्याच्या नावावर सीम कार्ड मिळवल्याचा आरोप घायवळवर आहे. हे सीम कार्ड वापरून त्याने बँकांमध्ये बनावट खातं उघडण्यासाठी आणि KYC साठी त्याचा वापर केला. 2020 मध्ये ही घटना घडली असून दुकानदाराने विरोध केल्यानंतर त्याला धमकावण्यात आलं.
आधारकार्डाच्या आधारे मिळालेलं सीम कार्ड घायवळने स्वतःच्या आणि दोन कंपन्यांच्या नावावर बँक अकाउंट्स उघडण्यासाठी वापरलं. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आता घायवळविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Ravindra Dhangekar Vs Chandrakant Patil : धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांवर आरोप
गुंड निलेश घायवळ प्रकरणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. निलेश घायवळ किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात. यामुळेच त्यांचे धाडस होत चालले आहे, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. समीर पाटील ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जातो, त्यावेळेस चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा असल्यामुळे तो पोलिसांवर दबाव टाकतो असंही धंगेकर म्हणाले. धंगेकरांनी समीर पाटील यांच्यावर मोक्का, फसवणूक (चीटिंग) अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला आहे.
रवींद्र धंगेकरांनी कोथरूडमधील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवरून चंद्रकांत पाटलांना आव्हान दिले. कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी चालते, रोज मुडदे पडतात, रिव्हॉल्व्हर निघतायेत. तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्ही म्हणा एकदा की आम्ही त्यांचा खात्मा करू. गौतमी पाटीलवर ॲक्शन घेणारे चंद्रकांत पाटील या गुंडांना उचला असे का म्हणत नाहीत? चंद्रकांत पाटील तुम्ही त्यांना घाबरत आहात का? असा सवाल धंगेकर यांनी केला.
ही बातमी वाचा:



















