Pune: पुण्यात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा खून, पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाने आरोपी गजाआड
Pune Crime: मोटर चोरीची तक्रार अधिकाऱ्यांकडे करतो असं त्या महिलेने म्हणताच आरोपीने तिच्यावर कोयत्याने वार करत तिची हत्या केली होती.
Pune Crime: पुण्याच्या मांजरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या एका पुरातन विहिरीत उषा देशमुख या 50 वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. शेळ्या चारण्यासाठी ही महिला या परिसरात आली होती. या महिलेवर दगडाने आणि कोयत्याने वार करून तिचा खून करण्यात आला होता. निर्जन स्थळ असल्याने कुठलाही पुरावा आरोपीने मागे सोडला नव्हता. मात्र असं असतानाही हडपसर पोलिसांनी कौशल्याने तपास केला आणि आरोपी राजेश अशोक मुळेकर याला अटक केली.
24 एप्रिलच्या दुपारी 3 वाजता उषा देशमुख या शेळ्या चारण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेत गेल्या होत्या. यावेळी आरोपी त्या परिसरात असणाऱ्या खजाना विहिरीवरील मोटर चोरून घेऊन जात होता. उषा यांनी आरोपीला पाहिलं आणि हटकलं. तुझ्याबाबत येथील अधिकाऱ्यांना सांगते असंही त्या म्हणाल्या. उषा देशमुख यांच्या या एका वाक्याने आरोपी घाबरला आणि त्याने या भीतीपोटीच त्यांचा खून केला.
आरोपी राजेश मुळेकर हा सराईत गुन्हेगार आहे. पाच दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून आला होता. मात्र चोरी करताना पकडला गेल्याने पुन्हा तुरुंगात जावे लागेल अशी त्याला भीती होती आणि या भीतीपोटीच त्याने उषा देशमुख यांचा अतिशय निर्घृणपणे खून केलाय. हे करताना त्याने कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. मात्र तरीही पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या.
पुण्यात दिवसाढवळ्या हत्या
पुण्यातील (Pune) केशवनगर भागात 50 वर्षीय व्यक्तीची दिवसाढवळ्या कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. काल (30 एप्रिल) दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र गायकवाड असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गैरकृत्य करताना हटकल्याने चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकत्र येऊन त्यांच्यावर वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.
रवींद्र गायकवाड हे केशवनगर भागातील गुरुकृपा सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या जागेवर गेले होते. त्यावेळी काही तरुण त्या ठिकाणी गैरकृत्य करत असल्याचं त्यांना दिसून आलं. या ठिकाणी बसू नका आणि निघून जा असं रवींद्र गायकवाड यांनी त्या तरुणांना सांगितलं. परंतु ही बाब तरुणांना रुचली नाही. या गोष्टीचा राग मनात धरुन त्या तरुणांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली. काही वेळाने ते तरुण आणखी काही साथीदारांना घेऊन आले आणि रवींद्र गायकवाड यांच्यावर कोयत्याने तसंच इतर शस्त्राने वार केला. या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.