Pune Crime news : पोलिसांचा धाकच नाही; तरुणांनी तलवारीनं फोडल्या 14 गाड्या, गाड्यांचं मोठं नुकसान
परिसरात दहशत राहावी म्हणून 10-12 जणांनी तलवारीनं 14 हून अधिक गाड्यांची तोडफोड केली आहे. रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चार चाकी, दुचाकी अशा विविध गाड्यांचे नुकसान आहे.
Pune Crime News : पुण्यात कोयता गँगनंतर (Pune Crime News) आता गाड्या फोडणारी टोळी धुमाकूळ घालताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून ही टोळी अनेक परिसरातील महागड्या गाड्यांची तोडफोड करताना दिसत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा पुण्यातून समोर आली आहे. परिसरात दहशत राहावी म्हणून 10-12 जणांनी तलवारीने 14 हून अधिक गाड्यांची तोडफोड केली आहे. रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चारचाकी, दुचाकी अशा विविध गाड्यांचे नुकसान आहे. पुण्यातील कोंढवा भागातील टिळेकर नगरमधील घटनेमुळे नागरिक भयभीत झाल्याचं बघायला मिळालं.
पोलिसांनी लगेच या टोळीला पकडलं आणि त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. हृषिकेश गोरे (20), सुशील दळवी (20), प्रवीण भोसले (19 ) असे आरोपींचे नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हा सगळा प्रकार बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. ही सगळी मुलं पंचवीशीच्या आतील आहेत. त्यामुळे पुण्यात तरुण गुन्हेगार वाढत असल्याचंदेखील अशा घटनांमधून समोर आलं आहे. रात्री 4 दुचाकींवर 10-12 जण कोंढवा भागात असणाऱ्या टिळेकर नगरमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या जवळील असलेली तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात 6 चार चाकी, 3 दुचाकी, 3 टेम्पो, 1 रिक्षा, 1 छोटा टेम्पो असे एकूण 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी आरोपी यांना शिवीगाळ केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आणि भागात आपले वर्चस्व टिकून राहावे म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून बाकीच्यांचा शोध सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील हॉटेल बाहेर तरुणांनी राडा घातला होता. पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने तोडफोड केली होती. लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात हॉटेलचं मोठं नुकसान झालं होतं. हॉटेलच्या मालकाशी वाद घातला होता आणि त्यानंतर मालकावर हल्ला केला होता. थरारक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. चार ते पाच जण हे या हॉटेलच्या समोर बसले असताना हॉटेल मालकाने येथे बसू नका असे सांगितले आणि त्यांना हटकलं. याच गोष्टीचा राग मनात धरून या टोळक्याने दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन कोयत्याने तोडफोड केली तसेच हॉटेल मालकाला देखील धमकवलं होतं. 4 जणांना पोलिसांनी अटक केली होती.