Pune Crime News: दोन कोटींची लाच मागणारा पीएसआय प्रमोद चिंतामणी अखेर बडतर्फ, 46 लाखांची लाच स्वीकारताना सापडलेला रंगेहाथ
Pune Crime News: दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणीला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Pune Crime News: दोन कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (Pramod Chintamani) याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी याबाबत आदेश जारी केले असून, चिंतामणी याच्या अनेक गैरकृत्यांचा तपशील समोर आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Pune Crime News: ‘दाम दुप्पट’च्या नावाखाली पाच कोटींची फसवणूक
तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, चिंतामणी याने पिंपरी-चिंचवड परिसरातील 40 हून अधिक नागरिकांना "पैसा दुप्पट करून देतो" असे आमिष दाखवून फसवणूक केली होती. या फसवणुकीचा आकडा तब्बल 5 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. पीडित नागरिकांनी भोसरी पोलीस ठाण्यात या बाबत तक्रारी केल्या असून, आर्थिक लाभासाठी चिंतामणी याने फसवणुकीचे पैसे स्वतःच्या मेहुण्याच्या बँक खात्यावर जमा करून घेतल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे.
Pune Crime News: 46 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
2 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन कोटींची लाच मागणाऱ्या चिंतामणीला जाळ्यात ओढले होते. ACB ने सापळा रचून 46 लाख 50 हजार रुपये लाच स्वीकारत असताना प्रमोद चिंतामणीला रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर त्याच्या घरी झडती घेण्यात आली असता आणखी 51 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. लाच प्रकरणाच्या वेळी चिंतामणी आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता.
Pune Crime News: प्रमोद चिंतामणी शासकीय सेवेतून बडतर्फ
आता दोन कोटींच्या लाचप्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या संबंधीचे आदेश पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी जारी केले आहेत. प्रमोद चिंतामणीच्या विविध गैरकृत्यांचा तपशील समोर आल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Pune Crime News: पुण्यात आठ कोटींची लाच मागणाऱ्या दोघांना अटक
दरम्यान, पुण्यातील एका सहकारी संस्थेच्या सभासदांकडून तब्बल आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लिक्विडेटर आणि ऑडिटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत सहकार विभागातील लिक्विडेटर विनोद देशमुख आणि ऑडिटर भास्कर पोळ यांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यातील धनकवडी परिसरातील एकता सहकारी संस्था 2005 साली स्थापन झाली असून तिचे एकूण 32 सभासद आहेत. संस्थेच्या मालकीची एक महत्त्वाची जागा पुण्यात आहे. मात्र सभासदांमध्ये 2020 साली झालेल्या वादानंतर हे प्रकरण सहकार विभागाकडे गेले आणि 2024 मध्ये विनोद देशमुख यांची संस्थेवर लिक्विडेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. लिक्विडेटर पदावर कार्यरत असताना देशमुख यांनी सभासदांना शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तीन कोटी रुपये, तर संस्थेची जागा विक्री करण्यासाठी परवानगी हवी असल्यास अतिरिक्त पाच कोटींची लाच मागितल्याचे समोर आले आहे. या आठ कोटींच्या मागणीतील पहिला हप्ता म्हणून तीस लाख रुपये स्वीकारताना ACB ने विनोद देशमुख आणि भास्कर पोळ या दोघांना शनिवार पेठेतील एका कार्यालयासमोर रंगेहाथ पकडले.
आणखी वाचा
























