Pune Accident : पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती, दारूच्या नशेत कारचालकाने अनेक वाहनांना उडवले, एकाचा मृत्यू तर चार जण जखमी
Pune Car Accident : नारायण पेठ पोलीस चौकीकडून चारचाकी वाहन झेड ब्रिजच्या दिशेने आलेल्या या कारचालकाने दोन रिक्षांना धडक दिली आणि काही पादचाऱ्यांना उडवले.
पुणे : पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती झाली असून एका कारचालकाने दारूच्या नशेत अनेक वाहनांना उडवले. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. नारायण पेठ पोलीस चौकीकडून चारचाकी वाहन (Pune Car Accident) झेड ब्रिजच्या दिशेने आलेल्या या कारचालकाने दोन रिक्षांना धडक दिली आणि काही पादचाऱ्यांना उडवले. उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) असे या कार चालकाचे नाव आहे. तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) असे गाडीमालकाचे नाव आहे.
पुण्यातील झेड ब्रिज नारायण पेठेतील रस्त्याला जिथे येऊन मिळतो तिथे ही घटना घडली. दारुच्या नशेत असलेल्या कारचालकाने धडक दिल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक आणि काही वाहनचालक जखमी झालेत. दारूच्या अंमलाखाली असलेल्या कारचालकाला लोकांनी आधी चोप दिला आणि नंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं.
Santosh mane : संतोष माने प्रकरणाची आठवण
पुण्यात घडलेल्या या घटनेने 2012 सालच्या संतोष माने प्रकरणाची आठवण करून दिली. 25 जानेवारी 2012 मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत मनोरुग्ण असलेल्या संतोष मानेनं 9 जणांना चिरडलं होतं. तर 37 जण जखमी झाले होते.
संतोष माने हा मूळचा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवथळे गावचा होता. ड्रायव्हर म्हणून 13 वर्षांची सेवा झालेला संतोष स्वारगेट डेपोत नियुक्तीवर होता. 25 जानेवारी 2012 रोजी त्याने स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेतली. भर रस्त्यात बेफाम बस चालवून त्यानं 9 जणांना चिरडलं होतं, तर 37 जण जखमी झाले होते. शिवाजीनगर कोर्टात वर्षभर खटला चालला होता आणि 8 एप्रिल 2013 रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही दुर्मिळातील दुर्मिळ आणि अतिहिंसक घटना असल्याचं कोर्टानं नमूद केलं होतं.
ही बातमी वाचा:
- Supriya Sule : अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालणार, फडणवीसांनी ही संधी द्यावी; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?