Nagpur Crime : गृहमंत्र्यांच्या शहरात हे काय चाललंय? नागपुरात गुंडांनी जाळली पोलिसांची वाहने
काही दिवसांपूर्वी पोलिसांना गस्तीदरम्यान काही लोकं संशयास्पद अवस्थेत दिसले होते. कर्मचाऱ्यांनी आवाज दिल्यावर ते लोक पळून गेले होते.पाठलाग करुनही ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते.
Nagpur News : एकीकडे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांकडून (Nagpur Police) करण्यात येतो. तर दुसरीकडे दररोज शहरात नव नव्या गुन्हेगारी घटना घडत असल्याचे समोर येत आहे. नुकतेच अमरावती मार्गावरील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील पोलीस चौकीसमोर ठेवलेली पोलीस कर्मचाऱ्यांची वाहने (Sitabuldi Police) गुन्हेगारांनी जाळली. यासोबतच पोलीस चौकीतील पडदे जळाले असून काचादेखील फोडण्यात आल्या आहेत.
अमरावती मार्ग, बोले पेट्रोल पंप जवळ असलेल्या वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरातील पोलिस चौकीजवळ ठेवलेल्या बीट मार्शलच्या दुचाकी अज्ञान व्यक्तीने जाळल्या. या झोपडपट्टीमध्ये कुख्यात भुरू गँगच्या गुंडांचा वावर असल्याने येथील नागरिक सातत्याने हैराण होते. त्यातून पोलिसांनी परिसरात पोलिस चौकी तयार केली. दररोज रात्री पोलिस या चौकीत उपस्थित असतात. याशिवाय परिसरात गस्त घालण्याच्या उद्देशाने गाड्या चौकीसमोर लावून शासकीय वाहनाने निघून जातात.
'या' बीट मार्शलच्या दुचाकी पेटवल्या...
मध्यरात्री बीट मार्शल दिगांबर मोटे, मोहन पराडकर आणि श्याम पांडे हे तिघेही गस्तीवर जात असल्याने त्यांनी आपल्या दुचाकी पोलिस चौकीच्या बाजूला पार्क करुन ठेवल्या. नंतर ते पेट्रोलिंगला गेले असता मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास अचानक तिघांच्या दुचाकी जळाल्याचे दिसले. यामध्ये एक ड्रिम युगा, एक स्पेंडल आणि एक सीडी 100 या दुचाकींचा समावेश आहे. वाहनांना आग लागल्याची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले मात्र पोलिस पोहोचेपर्यंत वाहन जळून खाक झाले होते.
...म्हणून वाचली चौकी
पोलीस पोहोचेपर्यंत दुचाकींची आग कायम होती. चौकीलाही आग लागण्याचा धोका होता. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौकीच्या खिडकीवर पाणी टाकून आग विझवली. यासंदर्भात परिसरातील लोकांची चौकशी केली मात्र कोणाकडूनही माहिती मिळाली नाही. घटनेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे आरोपींचा सुगावा लागला नाही. सीताबर्डी पोलिसांनी जाळपोळीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
संतप्त गुन्हेगारांनी लावली आग?
काही दिवसांपूर्वी पोलिसांना गस्तीदरम्यान काही लोकं संशयास्पद अवस्थेत दिसले होते. कर्मचाऱ्यांनी आवाज दिल्यावर ते लोक पळून गेले होते. पाठलाग करुनही ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. यातून संतप्त झालेल्या गुन्हेगारांनी ही घटना घडवून आणली असावी या दिशेने पोलिसांकडून तपास सुरु असल्याची माहिती आहे.
हेही वाचा