Chandrapur News : शिकाऱ्याचीच झाली शिकार; वाघ, बिबट्यांची शिकार घडवून आणणारा वनविभागाचा खबरी गजाआड
Chandrapur News : शिकाऱ्याचीच झाली शिकार, वाघ आणि बिबट्यांची शिकार घडवून आणणारा वनविभागाचा खबरी गजाआड.
Chandrapur News : एरव्ही आपण जंगलातील प्राण्यांनी केलेल्या शिकारींचे थरारक आणि अंगावर काटा आणणारे व्हिडीओ पाहतो. पण चंद्रपुरात सध्या शिकाऱ्याच्याच शिकारीची चर्चा रंगली आहे. सध्या वन्यप्राण्यांची शिकार करण्यास सक्त मनाई आहे. अशातच एका वनविभागाच्याच खबऱ्याला गजाआड करण्यात आलं आहे. पण वन्य प्राण्यांच्या शिकारीबाबत वन विभागाला माहिती देणारा हा खबरी मात्र खरा शिकारी होता.
एकीकडे वाघ आणि बिबट्यांची शिकार घडवून आणायची आणि दुसरीकडे त्याची माहिती वनविभागाला देऊन सिक्रेट फंड लाटणाऱ्या एका खबऱ्याला चंद्रपूर वनविभागानं अटक केली आहे. या धक्कादायक प्रकरणाच्या खुलाशामुळं वनविभागानं गेल्या 2 वर्षांत उघडकीस आणलेल्या वाघ-बिबट्यांच्या शिकारीच्या आणि अवयव तस्करीच्या अनेक प्रकरणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नंदू पिंपळे... वय वर्ष 50... चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव क्षेत्रातील एक परिचित नाव. वन्यजीवांच्या शिकारी उघडकीस आणण्यात अनेक वेळा वनविभागाला महत्वाची माहिती देणारी व्यक्ती म्हणून त्याची ख्याती. मात्र शिकाऱ्यांची माहिती देणारा हा स्वतः शिकारी असेल, असा विचार कोणीच केला नसेल. या व्यक्तीच्या काम करण्याच्या पध्दतीवर दबक्या आवाजात अनेक जण चर्चा करत होते. मात्र ही व्यक्ती ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव येथील बिबट्याच्या शिकार प्रकरणात गजाआड झाली आणि या सर्व चर्चा अखेर खऱ्या ठरल्या.
गेल्या दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ आणि बिबट्यांच्या शिकारी आणि अवयव तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या. विशेष म्हणजे, यासर्व घटना नागपूर वनविभागातील अधिकाऱ्यांनी उघडकीस आणल्या. आरोपींना तो चंद्रपूर जिल्ह्याच्या बाहेर वाघ आणि बिबट्यांच्या अवयवाचा सौदा करण्याच्या बहाण्यानं बोलवायचं आणि सापळा रचून त्यांना अटक करण्यासाठी मदत करायचा. दरवेळी ही स्टोरी ठरलेली.
गेल्या 2 वर्षांत पोंभूर्णा तालुक्यातील भटाळी, गोंडपिंपरी तालुक्यातील पाचगाव, सावली तालुक्यातील चिंचबोडी, सिंदेवाही तालुक्यातील धानोरा, चंद्रपूर तालुक्यातील चेकबोर्डा आणि नागभीड तालुक्यातील खरकाळा येथे गावकऱ्यांकडून वाघाच्या आणि बिबट्यांच्या शिकारीच्या आणि अवयवांच्या तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासर्व घटना नंदू पिंपळे यानेच ग्रामस्थांना पैशाचं अमिष दाखवून घडवून आणल्याची दाट शक्यता आहे.
नंदू पिंपळे याला अटक करण्यात येऊ नये, म्हणून यासाठी वनविभागाच्याच अनेक अधिकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणला. मात्र प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातून सूत्र हलली आणि बंडू पिंपळे गजाआड झाला. आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास वाघांचे खरे शिकारी आणि त्यांचे उच्चपदस्थ सूत्रधार समोर येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 'साथी राहुल गांधी, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?', भूमी अधिग्रहण कायद्यावरुन राजू शेट्टींचं पत्र
- Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी
- सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरण; बारामती न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा