Nashik Crime : दारू प्यायला पैसे मागितले, नकार देताच नवऱ्याकडून बायकोच्या डोक्यात हातोडीने वार; नाशिकमधील घटनेने खळबळ
Nashik Crime : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यात घडली आहे.

Nashik Crime : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना सिन्नर तालुक्यातील निमगाव सिन्नर येथे मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेत नंदा किरण सानप (वय 34) या विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेनंतर फरार झालेला संशयित किरण विष्णू सानप (38) यास मुसळगाव एमआयडीसी पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेत अटक केली आहे. (Nashik Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, निमगाव-सिन्नरच्या टेकाडे वस्ती शिवारात राहणारे किरण विष्णू सानप आणि पत्नी नंदा किरण सानप यांच्यात नेहमीच खटके उडत होते. मंगळवारी (दि. 2) सकाळी 11 वाजेच्या सुमारास किरण सानप याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, तिने ते देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तो तिथून गावात आला.
हातोडीने पत्नीच्या डोक्यात वार
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो घरी न आल्याने त्याची आई आणि मुलाने त्याचा गावात शोध घेतला. आई आणि मुलाला पाहताच त्याने आपल्या टेकाडे मळ्यातील वस्तीवर धूम ठोकली. दारूच्या नशेत असलेल्या किरण सानप याने घरामागे शेतात काम करत असलेल्या पत्नीशी हुज्जत घातली आणि तेथेच हातात असलेल्या हातोडीने त्याने तिच्या डोक्यात वार केले.
उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू
छोटा मुलगा सार्थक हा घटनास्थळी आल्यानंतर त्याने आजूबाजूच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने जखमी अवस्थेतील नंदाला उपचारासाठी प्रारंभी सिन्नरला आणि त्यानंतर नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. रात्री 11.45 वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान नंदाची प्राणज्योत मालवली. दरम्यान, नाशिक येथील मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या माहितीनंतर मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्यासह एका टीमने निमगाव सिन्नरला तर दुसऱ्या टीमने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेत पंचनामा केला.
खुनाचा गुन्हा दाखल
दरम्यान, शवविच्छेदनानंतर मयत महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताचे वडील बबन गोपाळा साबळे (66) रा. दापूर, ता. सिन्नर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण सानप याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील करत आहे.
संशयिताला नाशिकमधून बेड्या
पत्नी नंदा हिच्याशी भांडण झाल्यानंतर किरण सानपने तिच्या डोक्यात हातोडीने प्रहार केला. ती रक्तबंबाळ होऊन शेतात पडल्यानंतर हातातील हातोडी फेकून देत संशयित किरण सानप याने तेथून धूम ठोकली. दरम्यान, मुसळगाव एमआयडीसी पोलिस त्याच्या मागावर होते. बुधवारी सकाळी किरण सानपचे मोबाईल लोकेशन सिन्नर येथे दाखवत होते. नंतर तो खाजगी वाहनाने नाशिककडे फरार झाला. तपासी पथकाने त्याला नाशिक येथून ताब्यात घेत अटक केली.
आणखी वाचा
























