Nashik : नाशिकमध्ये चोरांचा सुळसुळाट, पाच घटनांमध्ये सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास
Nashik News : आता नाशिक शहरात चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. यात सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime News नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात चोऱ्यांचे प्रमाण (Nashik Crime News) वाढले आहे. वाढत्या चोऱ्या रोखणे हे पोलिसांपुढे (Nashik Police) मोठे आव्हान आहे. आता नाशिक शहरात चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. यात सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीचा पहिला प्रकार आडगाव शिवारात घडला आहे. अनिल ठाकरे यांनी मुंबई आग्रारोड वरील आडगाव शिवारात ट्रक टर्मिनल येथे नादुरूस्त झालेला ट्रक उभा केला होता. अज्ञात चोरट्याने या ट्रकमधील टाकीमध्ये असलेले 9 हजार 300 रुपये किंमतीचे 100 लिटर डिझेल चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी अनिल गणपत ठाकरे (रा. ओमशुभम अपार्टमेंट, जुना गंगापूर नाका) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
चोरीचा दुसरा प्रकार मखमलाबाद रोड येथे घडला आहे. सविता थेटे या शांतीनगर येथील बालाजी एंटरप्रायजेस समोरील रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलीवरून आलेल्या अज्ञात इसमाने थेटे यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून चोरून नेले. याप्रकरणी सविता सुभाष थेटे (रा. यशवंत बंगला, मखमलाबाद, नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामकुंड परिसरातून मोटारसायकलची चोरी
चोरीचा तिसरा प्रकार रामकुंड येथे घडला आहे. रामचंद्र भरसट (रा. टिल्लोळी, ता. दिंडोरी) हे रामकुंड येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी एम. एच. 15 डिजे 4341 या क्रमांकाची मोटारसायकल देवमामलेदार मंदिराजवळील पटांगणात उभी केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
60 हजारांचे दागिने लंपास
चोरीचा चौथा प्रकार अहिल्याबाई होळकर पुलाजवळ घडला. संगीता योगेश कापसे ही महिला सुंदर नारायण मंदिराजवळील महाराष्ट्र गादीवालाजवळून अहिल्याबाई होळकर पुलाच्या पायऱ्यांवर उभी होती. त्यावेळी दोन अनोळखी इसम त्यांना रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या अंगावरील दागिने काढून रुपालात ठेवण्यास सांगितले. त्यावेळी या दोघा अनोळखी इसमांनी महिलेच्या अंगावरील सुमारे 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने स्वतःच्या हाताने काढून घेऊन पसार झाले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेळा बसस्थानकातून सोन्याची पोत लांबवली
चोरीचा पाचवा प्रकार मेळा बसस्थानक येथे घडला. संगिता मुरलीधर दाते या गावी जाण्यासाठी मेळा बसस्थानक येथे आल्या होत्या. यावेळी बसस्थानकात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने या महिलेच्या गळ्यात असलेली 60 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत नजरचुकवून चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Nashik News : नाशिककरांनो पाणी जपून वापरा! शहरातील 'या' भागांत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद