Nanded : सहशिक्षिकेच्या शोषणामुळे शिक्षकाने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं, नांदेडमधील गारगव्हाण येथील घटना
Nanded Teacher Suicide: शिक्षिकेने ब्लॅकमेल करून पैशाची मागणी केल्याने शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे.
नांदेड : सहशिक्षिका सातत्याने ब्लॅकमेल करत असल्याने नांदेड जिल्ह्यातील मौजे गारगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या अनिल मोहनराव चव्हाण (वय 40) या शिक्षकाने शाळेतच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे. सहशिक्षिका वारंवार पैशाची मागणी करत असल्याने मी कंटाळून आत्महत्या करत असल्याचे मयत शिक्षक चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. मयत चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
मयत शिक्षक अनिल चव्हाण हे मुखेड तालुक्यातील सोनपेठवाडी या गावचे मूळ रहिवासी होते. वस्ती शाळेवर काही वर्ष काम केल्यानंतर हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथे सन 2014 साली जिल्हा परिषद शाळेवर त्यांची नियुक्ती झाली होती. तेव्हापासून ते याच शाळेवर कार्यरत होते. हदगाव येथे ते एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. या दरम्यान याच शाळेतील सहशिक्षकेसोबत त्यांचे अनैतिक संबंध जुळून आले असल्याचा आरोप मयत शिक्षकाच्या पत्नीने केला आहे.
दरम्यान, अनेक वेळा या शिक्षिकेने अनिल चव्हाण यांच्याकडून उसने म्हणून पैसे मागून घेतले होते. असे एकूण तीन लाख 40 हजार रुपये या शिक्षिकेकडे येणे बाकी होते असा उल्लेखसुद्धा मयत शिक्षकाने आपल्या सुसाईड नोट मध्ये केलेला आहे. आरोपी सहशिक्षिका मयत अनिल चव्हाण यांना विविध कारणावरून ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करू लागली. मयत शिक्षक अनिल चव्हाण हे या प्रकारामुळे सतत चिंतेत असायचे. शेवटी हा प्रकार घरच्या व्यक्तींना समजल्याने मयत चव्हाण हे प्रचंड तणावात होते. यातूनच बुधवारी निकालाचे काम असल्याचे सांगून मयत शिक्षक अनिल चव्हाण हे गारगव्हाण येथे शाळेत आले आणि रात्री शाळेतच ते मुक्कामी थांबले.
गुरुवारी सकाळी आठ वाजता शाळेतील सेवकाने साफसफाईसाठी शाळेचे दार उघडले असता अनिल चव्हाण यांनी गळफास घेतल्याचे संबंधित सेवकाच्या निदर्शनास आले. ही बातमी गारगव्हाण गावासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी ही बाब मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. शेकडे यांना दूरध्वनीद्वारे कळवल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शेकडे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी तातडीने पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेतलं असल्याचं सांगण्यात येतंय.
ही बातमी वाचा: