Nanded : वाळू माफियांचे धाबे दणाणले; मांजरा नदी पात्रात धाडसत्र, 30 टिप्परसह कोट्यवधींची मालमत्ता जप्त
Nanded Crime News Updates : मांजरा नदीच्या पात्रातून 38 वाहने आणि पाच पोकलेन असे कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त करून एक मोठी धाडसी कारवाई केली आहे.
Nanded Crime News Updates : महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना विभाजन करणाऱ्या मांजरा नदीच्या पात्रतातून नेहमीच भरपूर वाळू उपसा होत असतो. पण हा अवैध रेती उपसा थांबवण्याचे काम कोणाचे आहे? यावर अनेकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात होतं. महसूल विभागाकडून मिळालेल्या परवानगी व्यतिरिक्त लाखो ब्रास वाळू उपसा या ठिकाणाहून केला जातो. दरम्यान बिलोली पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी मोठी कारवाई केली आहे. मांजरा नदीच्या पात्रातून 38 वाहने आणि पाच पोकलेन असे कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त करून एक मोठी धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर वाहन चालक, ठेकेदार, ठेकेदारांचे सहाय्यक यांना पळता भूई थोडी झाली होती.
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली उपविभागात सहा महिन्यापूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक या पदावर अर्चित चांडक यांची नियुक्ती झालीय. आपले प्रशिक्षण पूर्ण करून बिलोली उपविभागात आता पुन्हा एकदा जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे रेती माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
तेलंगणा व महाराष्ट्र राज्याला विभाजित करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मांजरा नदीच्या पात्रातून महसुल विभागाने दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त जास्तीचा वाळू उपसा होतो. मांजरा नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे महसुल प्रशासन व तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्याचे महसूल प्रशासन परवानगी देत असते. परंतु आपण दिलेल्या परवानगीशिवाय, रेती घाटावर योग्य देखरेख ठेवणे ही महसूल प्रशासनाचीच जबाबदारी असते. पण दोन राज्यांना विभाजित करणाऱ्या मांजरा नदीच्या पात्रातून बेसुमार होणाऱ्या अवैध वाळू उपशावर मात्र हेतूपुरस्पर कोणाचीही नजर नाही. किंबहुना दोन्ही राज्यातील महसुल प्रशासन याकडे 'अर्थ'पूर्ण पद्धतीने कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशासाठी असंख्य निवेदने, उपोषणे अनेक वेळा देण्यात आली आहेत. तरी पण अवैध वाळू उपसा मात्र सुरूच राहिलाय.
आज 16 मेची पहाट होण्याअगोदर सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांजरा नदीपात्रात धाड टाकली. अचानकपणे पोलिसांनी सुरू केलेल्या या धाडसत्राने मांजरा नदी पात्रात अवैध रेती उपसा करणारे रेती माफियांना मात्र पळता भुई थोडी झालीय. रेती उपसा करणारी वाहने जागेवरच ठेऊन रेती माफियांनी मात्र पळ काढला. पण आपली बरीच जंगम मालमत्ता ते सोडून गेले. अर्चित चांडक आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणावरुन वाळूने भरलेले 38 टिपर आणि 5 वाळू उपसा करणारे पोकलेन असे करोडो रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
दरम्यान सदर वाहनांत अवैधरित्या उपसा केलेली वाळू, मोटार वाहन कायद्यातील सर्व नियम धुडकावून जास्त भरलेली होती. अर्चित चांडक यांनी ही अवैध वाळू उपसा करणारी एवढी मोठी संपत्ती जप्त केली आहे. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालय बिलोली आणि मोटार परिवहन विभागाला देण्यात आला आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या कालावधीत मांजरा नदीच्या अवैध वाळू उपशावर ही सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे मानले जात आहे.
मांजरा नदी पात्रात धाड पण गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपशावर का नाही ?
मांजरा नदी पात्रात सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यक्षेत्रातील असल्याने येथे बरीच मोठी धाड टाकून अर्चित चांडक यांनी वाळू माफियांना चांगलाच मोठा झटका दिलाय. परंतु नांदेड जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी आणि त्यातून होणारा अवैध वाळू उपसा कोण थांबवणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र जिल्हाधिकारी कार्यालयापासून अर्धा किलो मीटर एवढेच आहे.तर जिल्हाधिकारी हे नांदेड महसूल प्रशासनाचे प्रमुख आहेत. मग त्यांनी या बाबत कारवाई करावी आणि गोदावरी नदीत होणारा अवैध वाळू उपसा बंद करावा अशी अपेक्षा नांदेडकरांकडून व्यक्त होत आहे. अवैध वाळू उपसा होणाऱ्या नद्यांवर नदी पाहणी करण्यासाठी पथके नियुक्त आहेत. त्या पथकांचे प्रमुख नियमित नदी पाहणी दौरे करीत असतात. मात्र कारवाई होताना दिसत नाही.