Nanded Crime : अंगणात थुंकल्याच्या कारणावरुन धाकट्या भावाकडून मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून
Nanded Crime : नांदेडमधील शिवरायनगर येथील धाकट्या भावाने मोठ्या भावाचा खून करण्याचे कारण ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. केवळ अंगणात थुंकल्याच्या कारणावरुन लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला.
Nanded Crime : क्रोध आल्याने माणसाच्या हातून काहीही घडू शकतं. रागाच्या भरात अनेकदा माणून आपली सदसद्विवेकबुद्धी गमावतो आणि मग होत्याचं नव्हतं होतं. अशीच एक भयंकर घटना नांदेडमध्ये घडली आहे. रक्ताच्या नात्यानेच एका तरुणाचं आयुष्य संपवलं. अंगणात थुंकल्याच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
नांदेड शहरातील शिवरायनगर इथ ही धक्कादायक घटना घडली. क्षुल्लक कारणावरुन लहान भाऊ एकनाथने सख्खा मोठा भाऊ सतीशचा खून केला. आजपर्यंत आपण मालमत्ता, पैशांचा वाद, शेतीचा वाद, वाटणी आणि अनैतिक संबंध अशा अनेक कारणांनी भावाने भावाचाच काटा काढल्याचे उदाहरणं पाहिली आहेत. मात्र, नांदेडमधील शिवरायनगर येथील धाकट्या भावाने मोठ्या भावाचा खून करण्याचे कारण ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. केवळ अंगणात थुंकल्याच्या कारणावरुन लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान भाऊ एकनाथ तुपसमुद्रे आणि मोठा भाऊ सतीश तुपसमुद्रे यांच्यात अंगणात थुंकल्याच्या कारणावरुन वाद झाला. रागाच्या भरात एकनाथने घरातून भाजी चिरण्याचा चाकू आणला आणि सतीषच्या छातीवर सपासप वार केले. काही कळण्याच्या आतच सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक धावले, मात्र एकनाथने घटनास्थळावरुन पलायन केले.शेजारच्या लोकांनी सतीशला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता, रुग्णालयाच्या आवारातच त्याची प्राणज्योत मालवली.
सतीश आणि एकनाथ हे दोघे सख्खे भाऊ एकाच ठिकाणी राहतात. मात्र,अंगणात थुंकल्याच्या क्षुल्लक कारणाने सतीशला स्वतःचा जीव गमवावा लागला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी एकनाथ पसार झाला होता. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात एकनाथ तुपसमुद्रे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हत्या करुन पळ काढलेल्या एकनाथला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले. भाग्यनगर पोलिसांनी आरोपी एकनाथला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
अनुसूचित जमातीतील व्यक्तींना हिंदू विवाह कायदा लागू होत नाही, नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय