Crime News: चोरीसाठी गॉसिपिंगमधील माहितीचा वापर; नालासोपाऱ्यात 23 वर्षीय तरुणीसह अल्पवयीन अटकेत
Crime News: गॉसिपिंगच्या माहितीच्या आधारे 9 लाखांची चोरी करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीसह एका अल्पवयीन मुलालादेखील अटक करण्यात आली आहे.
Crime News: मित्रमैत्रिणींसोबत गॉसिपिंग करताना जरा सावध व्हा. एका 23 वर्षीय मुलीने गॉसिपिंगमधील माहितीचा वापर करत तब्बल 9 लाखांची (Robbery) चोरी केली असल्याची घटना समोर आली आहे. या चोरी प्रकरणी एका 23 वर्षीय युवतीला अटक करण्यात आली आहे. तर, चोरीत मदत केली म्हणून एका अल्पवयीन मुलाला देखील अटक करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यामध्ये (Nalasopara News) हा गुन्हा घडला आहे. आरोपींनी ही चोरी मौजमजेसाठी केली असल्याचे समोर आले आहे. .
नालासोपऱ्यातील एका फ्लॅटमधून 9 लाखांवर डल्ला मारलेल्या आरोपींनी फ्रीज, फर्निचर विकत घेतले. इतकंच नाही तर, केटीएम कंपनीची मोटारसायकल देखील यांनी विकत घेतली होती. महिलांच्या गॉसिपिंगच्या माध्यमातून आरोपींना घरामध्ये पैसे असल्याची माहिती मिळाली.
नालासोपाऱ्यात 35 वर्षाच्या दिव्या सुरेश पटेल या रश्मी गार्डन एव्हरशाईन सिटी नालासोपारा येथे राहतात. त्यांना नवीन घर घ्यायचं होते. त्यासाठी त्यांनी आठ लाख छत्तीस हजार रुपये रोख रक्कम आपल्या घरातल्या तिजोरी मध्ये 13 नोव्हेंबर 2022 ला ठेवले होते. दरम्यानच्या मधील काळात त्यांनी तिजोरी उघडली नव्हती. 23 नोव्हेंबरला तिजोरी उघडली त्यावेळी तिजोरीतील पैसे गायब झालेले होते. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
नालासोपारा येथील आचोळे पोलीस स्टेशन मध्ये कलम 380, 454 नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. इतर गुन्ह्यामध्ये ज्या वेळेला चोरी होते त्यावेळी घरातलं सामान अस्तव्यस्त पडलेलं असते. चोर सराईत गुन्हेगार असतात. मात्र, या गुन्हयात तसं काहीच दिसून आले नाही. पोलिसांनी जवळपास 100 हून अधिक सीसीटीव्ही तपासले. परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही.
त्यामुळे ही चोरी आसपासच्या लोकांनी किंवा बिल्डिंग मधल्याच कुठल्यातरी लोकांनी केलेली असावी, असा पोलिसांना संशय आला. चोरी केल्यानंतर तिजोरीची चावी ही तिजोरीलाच होती. इतर वेळेस चोर चोरी करतो तेव्हा घरात जे मिळेल ते चोरतो, परंतु या घटनेत तसं नव्हतं म्हणून पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांनी तक्रारदार महिलेला खडसावून विचारत घरात पैसे आहेत हे कुणाला माहित होतं का, याची विचारणा केली. त्यावेळी तिने तिघांची नावं सांगितली. त्याच वेळी त्या तिघांचे मोबाईल सीडीआर तपासले आणि यात एका मुलीवर पोलिसांना संशय आला. हर्षिता उदयशंकर गुप्ता या 23 वर्षीय मुलीवर पोलिसांना संशय आला. ही मुलगी त्याच इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर वास्तव्य करते. या आरोपी युवतीचे तक्रारदार महिलेच्या घरामध्ये येणं जाणं होते. तिला गॉसिपमधून त्यांच्या तिजोरीत 9 लाख रुपये आहेत.
चोरीच्या पैशातून आयफोन खरेदी, पूजा
हर्षिताने ही चोरी करताना आपल्या एका अल्पवयीन मुलाची मदत घेतली. त्याच्या मदतीने घराचं कुलूप तोडलं आणि घरात जाऊन ही चोरी केली. चोरी केल्यानंतर हे दोघं पळून जाण्याचा तयारीत होते. परंतु त्या आधीच पोलिसांच्या हाती हे दोघे लागले. त्यांनी 50 हजार रुपये खर्च करत घरात पूजा केली. एवढंच नाही तर एक आयफोन खरेदी केला. चोरीच्या पैशातून त्यांनी फ्रीज आणि फर्निचर विकत घेतलं. येत्या काळात दोघेही उत्तर प्रदेशात स्थलांतरीत होणार होते. सध्या अल्पवयीन मुलाची भिवंडीच्या बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.