Nagpur Accident Update : रामझुला मर्सडिज कार अपघात प्रकरणी मद्यधुंद महिलेला दिलासा नाहीच! उच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळला
Nagpur Accident Update : नागपुरातील राम झुला मर्सडिज कार अपघात प्रकरणी ऋतिका मालू यांचा तात्पुरता अटक पूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालय पाठोपाठ आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही फेटाळून लावला आहे.
Nagpur Accident News नागपूर : नागपुरातील राम झुला रेल्वे ओव्हर ब्रीजवरील मर्सडिज कार अपघात प्रकरणी (Nagpur Accident) मोठी माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या ऋतिका ऊर्फ रितू मालू यांचा तात्पुरता अटक पूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालय पाठोपाठ आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही फेटाळून लावला आहे. यापूर्वी 24 मे रोजी नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने सुद्धा रितिका मालू यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतरच रितिका मालू यांनी उच्च न्यायालयाच्या (High Court) नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र या प्रकरणी आदेश देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही आज हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे रितिका मालू यांच्या अडचणीत वाढ झाली असून आजही त्यांना दिलासा न मिळाल्याचे समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपुरातील राम झुला रेल्वे ओव्हर ब्रीजवर अपघाताची ही घटना तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. रितू मालू आणि त्यांची मैत्रीण सीपी क्लबमध्ये गेल्या होत्या. तिथून दोघी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान मर्सिडीज कार ने घरी परतत असताना रामझुल्यावर रितिका यांनी कारचा वेग वाढविला आणि समोर दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली होती. यात मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा सखोल तपास करत असताना नागपूर पोलिसांना सढळ पुरावे हाती लागले होते. त्यामुळे हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी रितिका मालू यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला होता.
सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात रितिका मालू यांचा अटकपूर्व जामीन आधी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही त्या संदर्भात दिलासा देण्यास नकार दिलाय. त्यामुळे आता रितिका मालू यांच्यासमोर पोलिसांना शरण येणे किंवा सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणे हेच दोन पर्याय असू शकतात. तसेच पोलीस त्यांच्या अटकेची कारवाई देखील करू शकतात. त्यामुळे या प्रकरणी पुढे नेमकं काय होतं हे बघणेही महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या