कुछ तुफानी करते है! फक्त थ्रिल म्हणून चोरी करणाऱ्या नागपुरातील 'बबली'ला पडल्या बेड्या
नागपुरात थ्रिल म्हणून चोरी करणाऱ्या तरुणीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूर : आजवर अनेक चोरांबद्दल आपण ऐकले आहे. काही जण मौजमजा करण्यासाठी चोऱ्या करतात. मात्र, नागपुरात एक महिला चोर फक्त सवय आणि थरारासाठी (थ्रिल) बाजारात चोऱ्या करायची. धक्कादायक बाब म्हणजे ही चोर तरुणी उच्चशिक्षित असून तिने पदव्युत्तर शिक्षण केले आहे. पोलिसांनी तिला अटक करून नागपूर शहरातील विविध बाजापेठांमधील 23 गुन्हे उघडकीस आणले आहे.
नागपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शहरातील सर्वात महत्वाच्या सीताबर्डी बाजारपेठेतून एका तरुणीला चोरी करताना रंगेहाथ अटक केली. तिची चौकशी करताना ती इंग्रजीसह तीन ते चार भाषांमध्ये पारंगत असल्याचे आणि तिला बरेच विषयांचे सखोल ज्ञान असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. जेव्हा पोलिसांनी तिच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची चौकशी केली तेव्हा ती दोन विषयात एमए असल्याचे समोर आले. जेव्हा पोलिसांनी तिने गेल्या काही महिन्यात कुठे कुठे चोऱ्या केल्या याची चौकशी सुरु केली. तेव्हा तिने दिलेल्या माहितीवरून पोलीस देखील चक्रावून गेले. चोर तरुणीने नागपूरच्या सीताबर्डी, गणेशपेठ, गिट्टीखदान, सदरसह अनेक भागात एक दोन नव्हे तर तब्ब्ल 23 चोऱ्या केल्याचे कबुल केले. पोलिसांनी तिच्याकडून 16 लाखांचे दागिने ही हस्तगत केले आहे..
चोर तरुणी ही मूळची नागपूरची असल्याने तिला शहरातील सर्व बाजारपेठाची सर्व माहिती आहे. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती सधन आहे. त्यामुळे ती चोरी का करते असे प्रश्नही तापसी अधिकाऱ्यांच्या पुढे निर्माण झाले. तेव्हा सीताबर्डी पोलिसांनी तिला चोरी करण्यामागचे कारण विचारले असता "ते तुम्हाला समजणार नाही, त्यात मला कोणते संधान मिळते, हे तुम्हाला कळणार नाही", असे उत्तर तरूणीने दिले.
चोरीची सवय जडली कशी?
काही वर्षांपूर्वी ती शिक्षण घेताना हॉस्टेलमध्ये राहत होती. तेव्हा तिच्या एका मैत्रिणीने तिला चोरीचे गुरुमंत्र दिले आणि बाजारात, गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्स आणि बॅगमधून रोख रक्कम आणि इतर किंमती मुद्देमाल कसे काढायचो हे शिकविले. सुरुवातीला दोघी मिळून चोरी करत असे. मात्र, नंतर चोरीच्या मुद्देमालाच्या वाटणीवरून दोघीमध्ये वाद होऊन दोघी वेगवेगळ्या चोऱ्या करायला लागल्या.
चोरी करण्याची तरुणीची कार्यपद्धती
पोलिसांच्या हातही लागलेली ही चोर तरुणी एवढ्या सफाईदार पद्धतीने महिलेच्या पर्समधील मुद्देमाल लंपास करते. बराच वेळ महिलांना आपल्या पर्समधून रोख रक्कम आणि दागिने चोरल्या गेल्याचे लक्षात देखील येत नाही. त्यामुळे आजवर तिच्या विरोधात अज्ञात महिला चोर म्हणून विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल होत होते. मात्र, ती कोण आहे आणि ती चोऱ्या कशी करते हे स्पष्ट होत नव्हते. आता तरुणीने 23 चोरीची कबुली दिल्यामुळे नागपूर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
दरम्यान, चोरलेल्या रोख रकमेला ती स्वतःच्या मौजमजेसाठी खर्च करायची. मात्र, महिलांच्या पर्स आणि बॅगमधून चोरी केलेले दागिने ती घरातच एका डब्ब्यात ठेवायची. चोरीचा माल कुणाला विकल्यास आपण पोलिसांच्या हाती लागू अशी तिला भीती होती म्हणून ती चोऱ्या करून ही दागिने स्वतःकडे साठवून ठेवायची.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
