Nagpur News : धक्कादायक! पोलीस निरीक्षकाकडून तरुणीचा विनयभंग; नागपुरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Nagpur News : अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Nagpur News नागपूर : अकोल्यातील (Akola News) खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे (Dhananjay Sayre) यांच्यावर नागपुरात (Nagpur News) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युपीएससीचा अभ्यास करीत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची छेडखानी केल्याचा ठपका पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणामुळे अकोला पोलीस (Akola Police) प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकाराने पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या तरुणीचा विनयभंग
अकोला शहर पोलिसांना नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी (Akola Police) तब्बल चार दिवस तक्रार न घेता रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवलं, असा आरोप एका महिलेने केला होता. हे प्रकरण ताजे असताना अकोला शहरातील एका पोलीस हवालदाराने तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला होता.
तर त्या आधी जानेवारी महिन्यात गोवर्धन हरमकार या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्या त्यानंतर ठाणेदारासह पाच कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. अशातच आता अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अकोला पोलिसांचे नाव चर्चेत आले आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल
हाती आलेल्या प्रथमिक माहितीनुसार, नागपुरातील नंदनवन भागात राहणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीची धनंजय सायरे यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी ही युवती यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होती. दरम्यान, या ओळखीतून धनंजय सायरे यांनी या युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने नकार दिल्यावर छेड काढत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवतीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्याविरुद्ध भादवि कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
