Nagpur Minor Rape : 12 आणि 13 वर्षीय मुलींसोबत लैंगिक छळाच्या दोन वेगवेगळ्या घटना
मैत्री आणि कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना नागपुरात घडल्या. एका तरुणाने मैत्रीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा छळ केला. तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीच्या आजोबानेच तिच्यावर अत्याचार केला.
नागपूर : नागपूर आणि गुन्हेगारी हे जणू समीकरणच बनलं आहे. गुन्हा घडला नाही असा एकही दिवस नागपुरात उगवलेला नाही. त्यातच आता दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहे. मैत्री आणि कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणाऱ्या या घटना आहेत. एका तरुणाने मैत्रीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा छळ केला. तर दुसऱ्या घटनेत मुलीच्या आजोबानेच तिच्यावर अत्याचार केला.
आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढून बळजबरीने शारीरिक संबंध
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाची पहिली घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. 24 वर्षीय आरोपी मनीष लिंबाळे याने त्याच्याच वस्तीत राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीसोबत व्हॉट्सअॅप चॅटिंगच्या माध्यमातून मैत्री जोडली. नंतर चॅटिंगच्या माध्यमातून मनीषने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 24 एप्रिल रोजी मध्यरात्री मुलीचे कुटुंबीय झोपल्यानंतर मनीषने तिलाआपल्या घरी बोलावून घेतले. यावेळी तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कोणाकडे घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित मुलगी काही दिवस गप्प राहिली. मात्र, नंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. पीडितेचे आईने रविवारी (5 जून) जरीपटका पोलीस स्टेशन गाठून मनीष लिंबाळेविरोधात तक्रार दिली. त्यानंतर सोमवारी (6 जून) पोलिसांनी मनीष लिंबाळेला पॉक्सो कायदा तसंच आयपीसीच्या कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करत अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचा आरोप असलेला मनिष लिंबाळे एका सरकारी कार्यालयात कंत्राटी कर्मचारी आहे.
आजोबांकडूनच नातीचा लैंगिक छळ
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. कौटुंबिक नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेत 13 वर्षीय मुलीचा तिच्या आजोबांनी लैंगिक छळ केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पीडित मुलीची आई गर्भवती असल्याने ती सध्या आपल्या माहेरी आली होती. ती गर्भवती असल्यामुळे मुलीला आजोबांकडे झोपायला पाठवत होती. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईने आजोबा आणि नात दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर कुटुंबात या विषयावर चर्चा झाली. मात्र, कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने पीडितेच्या आईला सर्वांनी गप्प बसवले. मात्र अखेरीस पीडितेने आणि तिच्या आईने पोलीस तक्रार देण्याचे निर्णय घेतला. त्यानंतर सोमवारी (6 जून) कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये पीडितेच्या आजोबाविरोधात पॉक्सो आणि आयपीसीच्या कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.