Nagpur : सिगारेटच्या तुकड्यावरुन आरोपीचा माग; पत्नीच्या हत्येबद्दल पतीला जन्मठेप
नागपूर खंडपीठापुढे सुनावणीसाठी आलेल्या हत्येच्या एका प्रकरणात न्यायालयाने चक्क सिगरेटचा तुकडा पुरावा म्हणून ग्राह्य धरत आरोपीला पत्नीच्या हत्येबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
नागपूर : गुन्हा करणारा आरोपी कितीही हुशार असो, तो काही ना काही पुरावा मागे ठेवतोच. याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आतापर्येंतत अशक्य वाटणाऱ्या अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. चंद्रपुरातही असाच काहीसा प्रकार घडला असून एका खूनाच्या प्रकरणात केवळ सिगारेटच्या तुकड्यावरुन पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. या प्रकरणातील महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याचं स्पष्ट झालं. नागपूर खंडपीठापुढे सुनावणीसाठी आलेल्या या हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने चक्क सिगरेटचा तुकडा पुरावा म्हणून ग्राह्य धरत आरोपीला पत्नीच्या हत्येबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशह पोलीस स्टेशन अंतर्गत 2015 मध्ये विवाहबाह्य अनैतिक संबंधामुळे पती पत्नी दरम्यान होत असलेल्या वादातून पत्नी सविता जावळेच्या हत्येची घटना घडली होती. पण आरोपी पती रमेश जावळे याने हत्येचा दिवशी आपण घटनेच्या ठिकाणी नव्हतो, आपण त्या दिवशी नागपूरला गेलो होतो असा दावा केला होता. पण घटनास्थळी पोलिसांना सिगारेटचे तुकडे सापडले होते. त्यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आणि त्या महिलेच्या पतीला अटक केली.
घटनास्थळी मिळालेल्या सिगारेटच्या तुकड्यावरून आणि त्यावर लागलेल्या थुंकीच्या डीएनए चाचणीचा अहवाल महत्वाचा पुरावा मानून न्यायालयाने आरोपी पतीचा स्वतःच्या बचावासाठी केलेला दावा खोटा मानला. शिवाय पत्नीच्या हत्येसाठी रमेश याने वापरलेल्या काठीवर लागलेले रक्ताचे डाग तसेच त्याच्या कपड्यांवर लागलेले रक्ताच्या डागाच्या डीएनए चाचणीत ते एकाच व्यक्तीचे असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर नागपूर खंडपीठाने जिल्हा व सत्र न्यायालयाने रमेश जावळे याला दिलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.
महत्वाच्या बातम्या :
- Thane Vaccination : कोरोना लसीऐवजी रेबिजचं इंजेक्शन, ठाण्यातील धक्कादायक प्रकार; डॉक्टर, परिचारिका निलंबित
- Maharashtra Corona Update : राज्यात आज 2, 844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.26 टक्के
- Kanhaiya Kumar Joins Congress: कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांचे स्वागत करताना राहुल गांधी काय म्हणाले?