(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात आज 2, 844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.26 टक्के
राज्यात आज 60 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 263 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 029 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 65 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.
राज्यात आज 60 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 263 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (04), नंदूरबार (4), धुळे (2), जालना (45), परभणी (58), हिंगोली (20), नांदेड (9), अकोला (29), वाशिम (09), बुलढाणा (18), यवतमाळ (06), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (5), चंद्रपूर (92), गडचिरोली (19 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 37 हजार 794 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,54,985 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,514 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 84, 29, 804 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,44, 606 (11.2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 394 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 394 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 477 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,813 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4611 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1200 दिवसांवर गेला आहे.
तब्बल साडेसहा महिन्यांनंतर रुग्णसंख्या 20 हजाराच्या आत
देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसतोय. गेल्या 24 तासात देशात 18 हजार 795 रुग्णांची भर पडली असून 179 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी नोंद झालेली रुग्णसंख्या ही गेल्या साडेसहा महिन्यांनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे देशासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 24 तासात देशात 26 हजार 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. देशात सोमवारी पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाच्या लसीचे एक कोटी डोस देण्यात आले असून आतापर्यंत 87 कोटी डोस पूर्ण झाले आहेत. केरळमध्ये काल 11 हजार 699 नव्या रुग्णांची भर पडली असून 58 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या एक लाख 57 हजार 158 सक्रिय रुग्ण संख्या आहे.