(Source: Poll of Polls)
रेल्वेत नोकरी देण्याच्या आमिषाने शेकडो तरुणांची फसवणूक, आरोपीला ठोकल्या बेड्या
Crime News: रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लाखोंचा चुना लावणाऱ्या आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली आहे.
Crime News: रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लाखोंचा चुना लावणाऱ्या आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. कांदिवलीच्या एकता नगरमधून ही अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीकडून रेल्वेचे बनावट लेटरहेड व जॉइनिंग लेटर यांच्या प्रती जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आरोपीच्या दुसऱ्या साथीदारास देखील अटक करण्यात आला आहे. जो तरुणांना रेल्वेतील मोठा अधिकारी असल्याचं सांगून नोकरी लावण्याच्या नावाखाली बेरोजगार तरुणांकडून तीस हजारापासून 85000 पर्यंत रक्कम घेत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे मध्ये नोकरी लावण्याचा नावाखाली फसवणुकींच्या अनेक घटना घडल्या होत्या. फिर्यादी मयुरी डीगे नावाच्या महिलेने रेल्वेत टीसीची नोकरी लावण्याच्या नावाखाली आरोपी जितेंद्र यशवंत घाडी (25 ) याने 50 हजार रुपये घेतले. मात्र अनेक महिने उलटून गेल्यानंतरही रेल्वेत नोकरी मिळाली नाही. वारंवार तगादा लावल्यानंतर आरोपी जितेंद्र यांनी रेल्वेचे एक जॉइनिंग लेटर दिले. मात्र याची शहानिशा केली असता ते जॉइनिंग लेटर बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी जितेंद्र विरोधात मयुरी डीगे नामक महिलेने जून 2022 मध्ये तक्रार दिली होती.
महिलेने तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी दहिसर पोलिसांनी पथके तयार करून तात्काळ कारवाईस सुरुवात केली. यावेळी आरोपी जितेंद्र गाडी हा मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कारशेडमध्ये ऑफिस बॉयचं काम करत असल्याचं समजले. येथूनच त्याला ही कल्पना सुचली असल्याचं तपासात पुढे आलं.
आरोपी जितेंद्र याने शेकडोहून अधिक बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याच्या नावाखाली फसवलं असल्याचं तपासात पुढे आलं आहे. संदर्भात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये आरोपी विरोधात फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल लोकेशन ट्रक करून त्याच्या घरचा पत्ता शोधून काढून त्याला कांदिवली येथून ताब्यात घेतलं. त्याच्या घरातून तीस ते चाळीस बोगस जॉइनिंग लेटर देखील जप्त करण्यात आली आहे.
अटक आलेल्या आरोपीने सांगितले की, त्याचा दुसरा साथीदार जितेन जगन्नाथ पंचागणे जो स्वतःला रेल्वेचा मोठा अधिकारी असल्याचे सांगून तरुणांकडून 80 ते 90 हजार रुपये घेत होता. यातील अवघे वीस टक्के इतकीच रक्कम आरोपी जितेंद्र याला मिळत होती, असेही तपासातून पुढे आले आहे. या दोन्हीही आरोपींनी मिळून आत्तापर्यंत 70 पेक्षा अधिक तरुणांना नोकरीच्या नावाखाली फसवले असल्याचं आढळून आले आहे. यातील 60 पेक्षा अधिक तरुणांना बोगस जॉइनिंग लेटर देखील देण्यात आले आहेत.