Mumbai Crime : महाविद्यालयावरून उडी मारली, तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलीने टोकाचं पाऊल का उचललं?
Mumbai News: मुंबईतील एका महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्सच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारी मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजला आली, वर्ग सुरु होताच तिसऱ्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाकली

Mumbai Crime Girl Suicide: मुंबईतील एका महाविद्यालयात गुरुवारी एक खळबळजनक घटना घडली. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीने महाविद्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन जीव (Suicide News) दिला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आत्महत्या केलेली ही तरुणी मुंबईतील एका महाविद्यालयात अंकशास्त्र विभागात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. ती गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली. पण महाविद्यालयाच्या सकाळच्या सत्राची लगबग सुरू असताना तिने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेऊन आत्महत्या केली.
या महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून ही आत्महत्या असल्याचे सांगितले जात असले तरी तिच्या पालकांना हा दावा मान्य नाही. आता पोलीस तपासात काय समोर येणार हे बघावं लागेल.
महाविद्यालयात नेमकं काय घडलं?
आत्महत्या केलेली तरुणी ही गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला आली होती. यानंतर सर्वजण वर्ग सुरु झाल्यानंतर आतमध्ये जाऊन बसले. मात्र, ती तरुणी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. कोणालाही पत्ता लागण्यापूर्वी तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. खाली पडल्यानंतर तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
Mumbai Suicide News: सीसीटीव्ही फुटेज ठरणार तपासातील महत्त्वाचा दुवा
पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे. महाविद्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. यापैकी एका कॅमेऱ्यात तरुणी तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर तिने नेमकी कशी उडी मारली, त्यावेळी तिच्यासोबत कोणी होते का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. पोलिसांच्या पुढील तपासात काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.























