Mumbai Crime: चोराने भरदुपारी धमकी देत रिक्षा चोरली..पोरानं पोलिसांवर विसंबून राहण्यापेक्षा स्वत: चोराला शोधलं अन्...
Mumbai Crime News: अखेर पोलिसांकडून मदत होईल तेव्हा होईल असा विचार करून मुलाने स्वत: चौकशी सुरू केली आणि चोराला पकडण्यास यश मिळाले
Mumbai Crime News: वडिलांची रिक्षा धमकी देत चोरणाऱ्या चोराला मुलाने स्वत: पकडले असल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्याने त्यांच्या मदतीवर विसंबून न राहता स्वत: चोराचा शोध घेतला आणि मित्रांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या हवाली केले. एखाद्या सस्पेन्स क्राईम थ्रीलर चित्रपटाला शोभेल अशी घटना गोरेगावमध्ये घडली आहे.
मुंबईतील गोरेगाव पूर्वमधील दिंडोशी परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकासोबत ही घटना घडली. दिंडोशी परिसरात प्रवासी भाडे घेतले होते. त्याच दरम्यान, परिसरातील व्हँलेंटाईन सॅटलाईट टॉवरजवळ सोमवारी भरदुपारी चोराने रिक्षा चालकाला सुरा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि रिक्षा, चालकाचा मोबाईल फोन घेऊन पसार झाला. अचानक झालेल्या या प्रकाराने रिक्षा चालक भांबवला. रिक्षाचा पाठलाग करण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर झाला प्रकार त्यांनी तातडीने आपल्या मुलाला फोनवर कळवला. त्यानंतर रिक्षा चालक आणि त्यांच्या मुलाने दिंडोशी पोलीस स्टेशन गाठले. पण ही घटना कुरार व्हिलेज पोलिस ठाण्याअंतर्गत येते असे त्यांना सांगितले. त्यानंतर बाप-लेकाने कुरार व्हिलेज पोलीस स्टेशन गाठले. त्यावेळी कुरार पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची नोंद केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत आणखी काही चौकशी केली. लवकरच आपण चोराला पकडू असे आश्वासन पोलिसांनी दिले.
पोलिसांनी मदतीचे आश्वासन दिले असले तरी मुलगा अस्वस्थ झाला होता. वडिलांसाठी काही महिन्यांपूर्वीच त्याने कर्जावर नवीन रिक्षा घेतली होती. त्यामुळे रिक्षाचे भाग वेगवेगळे करून ती मोडीत काढली तर, याची चिंता सतावत होती. अखेर पोलिसांकडून मदत होईल तेव्हा होईल असा विचार करून मुलाने स्वत: चौकशी सुरू केली. चोरी झालेल्या ठिकाणाजवळ सीसीटीव्ही आहेत आहेत का? याची पाहणी केली. यासाठी काही दुकाने त्याने पालथी घातली. एका सीसीटीव्हीत त्याला रिक्षा फिल्मसिटीच्या दिशेने जाताना दिसली. पुढे अधिक तपास केल्यावर कळाले की, चोराने फिल्मसिटीतील एका सेटवर क्रू असल्याची बतावणी करून दुपारचे जेवणदेखील केले. पण त्याच्या पुढे काही सुगावा लागत नव्हता. पण त्यांच्या मुलाने प्रयत्न सुरू ठेवले.
परिसरात पुन्हा संशयित दिसला
रिक्षा चोरीला गेल्याच्या रात्री आरोपी पुन्हा रिक्षा चालकाला संतोश नगर परिसरात दिसला. त्यांनी लगेच मुलाला बोलावून घेतले. पण मुलगा येण्याआधी त्या चोराने त्यांना पुन्हा धमकावले. तुम्ही माझे काही करू नाही शकणार. नशीब समजा तुम्हाला मी सोडतोय. कुणाला काही सांगितले तर लक्षात ठेवा, असे बोलून तो तिकडून पसार झाला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाने पुन्हा पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पण पोलिसांनी तपास सुरू असून आरोपीची प्राथमिक माहिती हाती लागली असल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या या माहितीवर त्यांचे समाधान झाले नाही.
स्थानिक आमदाराकडे धाव
पोलिसांकडून काही होत नसल्याचे बघून त्याने सोसायटीमधील मित्रांसोबत शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांच्याकडे धाव घेतली. सुनील प्रभू यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी यातील गांभीर्य लक्षात घेत दिंडोशी आणि कुरार व्हिलेज पोलीस स्टेशनशी संपर्क साधत कारवाई करण्यास सांगितले.
चोराचा नाट्यमय पाठलाग
पोलिसांकडून तपासाबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने अखेर रिक्षा चालकाच्या मुलाने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी संतोष नगर परिसरात दिसल्याने त्या ठिकाणी त्याचा शोध सुरू केला. मित्रपरिवारात व्हॉट्सअॅप ग्रुपवर या घटनेची माहिती देण्यात आली. अखेर मित्राच्या संपर्कातून अखेर एका मुलाकडे आरोपीचा फोटो सापडला. त्या मुलाने देखील एका प्रकरणात त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याचे समोर आले.
रिक्षाचालकाच्या मुलाला तो चोर पुन्हा एकदा संतोष नगर परिसरात दिसला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना याबाबत कळवले. मित्रांच्या मदतीने या भागातील रस्त्यांच्या विविध ठिकाणी मित्रांच्या मदतीने सापळा रचला. पण त्यावेळी,
त्यांनी पोलीस येईपर्यंत त्याचा पाठलाग करायचा निर्णय घेतला. यासाठी तो आणि त्याचे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले. काही जण त्याचा पाठलाग करत होती. तर काही तो जाणार त्याच रस्त्यावर वाट पाहत होती. तर, दुसरीकडे चोर हा पाण्याच्या बाटलीतून मद्य प्राशन करत होता. त्या ठिकाणातून चोराने रिक्षा पकडली आणि गोरेगाव गोकुळधाम मार्केट परिसरातील एका बारजवळ थांबवली. त्यानंतर चोर एका ठिकाणी लपून बसला. अखेर रिक्षावाल्याने त्याच्याकडून येणाऱ्या पैशाची अपेक्षा सोडून पुढे गेला. पण चोरावर त्याच्या मागावर असलेल्या मुलांची करडी नजर होती. पोलिसांना त्यांनी याबाबत कळवले होते. पण बराच वेळ कुणी आले नाही. शेवटी पुन्हा एकदा त्यांनी कॉल केला. पोलीस निघाले असल्याचे त्यांना सांगितले. पण आता त्या चोराला संशय यायला लागला. तो पळण्याच्या तयारीतच होता. पण मुलांनी त्याला घेरत ताब्यात घेतले आणि दिंडोशी पोलीस ठाण्यात नेले.
अखेर रिक्षा सापडली
दिंडोशी पोलिसांनी चौकशी केली तेव्हा गॅस संपल्यामुळे आरोपीने रिक्षा कांदिवलीला ठेवली असल्याचे समोर आले. तसेच त्याच्याकडून चोरीचे मोबाईल सापडले. यातील दोन मोबाइल फोन हे त्याने संतोष नगर ते गोकुळधाम मार्केट परिसरात अर्ध्या तासाच्या प्रवासा दरम्यान चोरले असल्याची कबुली दिली. त्याशिवाय त्याने इतर चोरीचे गुन्हे असल्याची कबुली दिली. आता या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास दिंडोशी पोलीस करत आहेत.