Mumbai Crime : NCB कडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; 120 कोटींचं मेफेड्रोन जप्त, सहा जण अटकेत
Mumbai Crime :
Mumbai Crime : मुंबईमध्ये (Mumbai) नार्कोटिक कंट्रोल ब्युरोला (NCB) मोठं यश आलं आहे. एनसीबीने एका आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला असून सहा जणांना अटक केली, ज्यामध्ये म्होरक्या आणि त्याच्या साथीदाराचाही समावेश आहे. सोबतच मुंबईतील गोदामातून 50 किलो मेफेड्रोन हा अंमली पदार्थ (Mephedrone Drug) जप्त केला आहे. याआधी गुजरातमधून 10 किलो मेफेड्रोन जप्त केलं होतं. जप्त केलेल्या एकूण 60 किलो ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 120 कोटी रुपये इतकी आहे. एनसीबीचे उपमहासंचालक एसके सिंह यांनी ही माहिती दिली. भास्कर व्ही, एस. जी. महिदा, एस.एम. चौधरी, मुथू पी.डी, एम आय अली आणि एम एफ चिस्ती अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. त्यापैकी एक जण हा एअर इंडियामध्य वैमानिक होता.
सुरुवातीला गुजरातच्या नेव्हल इंटेलिजन्सने काही लोकांच्या संशयास्पद हालचालींबद्दल माहिती शेअर केली होती. त्यानंतर, एनसीबीने मिळालेल्या माहितीच्या आधारे नेव्हल इंटेलिजन्सच्या समन्वयाने काम करण्यास सुरुवात केली. विविध पैलूंचे बारकाईने निरीक्षण केले आणि अतिरिक्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. उच्च दर्जाच्या ड्रग्जची मोठ्या प्रमाणात खेप गुजरातमधून इतर राज्यात नेली जाणार आहे असल्याचं समजलं. एनसीबीने तात्काळ अॅक्शन प्लॅन आखला.
3 ऑक्टोबर रोजी चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 10.350 किलो एमडी जप्त करण्यात आलं. यापैकी भास्कर व्ही याला गुजरातच्या जामनगरमधून तर एस. जी. महिदा, एस.एम. चौधरी आणि मुथू पी.डी. यांना मुंबईतून अटक करण्यात आली.
फोर्ट परिसरातील गोदामातून 50 किलो एमडी जप्त
त्यानंतर या चौघांच्या चौकशीतून, तसंच तपासातून अनेक खुलासे झाले. ड्रग्जची तस्करी मुंबईतून होत असल्याचं समोर आलं. त्यानुसार, एनसीबीला संबंधित घडामोडींबाबत सतर्क करण्यात आलं आणि ओळख पटलेल्या तस्करांवर पाळत ठेवण्यात आली. तस्कराने अंमली पदार्थांची तस्कर करण्यासाठी हालचाली करताच एनसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. प्राथमिक चौकशी आणि कारवाईनंतर 6 ऑक्टोबर रोजी मुंबईतील फोर्ट परिसरातील एसबी पथ इथे असलेल्या गोदामातून सुमारे 50 किलो एमडी जप्त करण्यात आलं. तपासाअंती एम आय अली आणि एम एफ चिस्ती या मुंबईत दोन व्यक्तींना अटक करण्यात आली.
अटकेतील एक जण एअर इंडियाचा माजी वैमानिक, तर एक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा
अटक केलेल्यांमधील एस जी महिदा नावाचा आरोपी हा वैमानिक होता. त्याने 2016-18 दरम्यान एअर इंडियामध्ये सेवा बजावली होती. त्याने अमेरिकेच्या टेक्सासमधील सॅन अँटोनियो आणि लिथुनिया इथून उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. तर मुथू पी डी नावाचा दुसरा व्यक्ती हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, ज्याला यापूर्वी देखील डीआरआयेने 2001 मध्ये 350 किलो वजनाच्या मँड्राक्स तस्करीच्या प्रकरणात अटक केली होती आणि 2008 पासून तो जामिनावर बाहेर होता.
जामनगर आणि मुंबईत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्त्रोत एकच असल्याचं तपासादरम्यान स्पष्ट झालं आहे. जप्त केलेलं एकूण 60 किलो एमडी हे एका खेपेचा एक भाग आहे आणि मुंबई पोलिसांनी यापूर्वी जप्त केलेल्या एमडीशी त्याचा संबंध असल्याचं समोर आलं आहे.
मेफेड्रोन म्हणजे काय?
MD अर्थात मेफेड्रोन हे उत्तेजक द्रव्य असून सामान्यतः बेकायदेशीर ड्रग्ज बाजारपेठेत म्याऊ म्याऊ किंवा एम-कॅट या नावाने ओळखलं जातं. जे लोक याची नशा करतात त्यांच्यामध्ये या ड्रगसाठी अनेक कोड प्रचलित आहे. खरंतर नशा करणाऱ्यांमध्ये कोकेन आणि हेरॉईनपेक्षा मेफेड्रोनला जास्त महत्त्व आहे कारण याची नशा मोठ्या प्रमाणात चढते.