(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News Mumbai : मोबाइलमध्ये गेम खेळण्याच्या नावाने 'गुगल पे'मधून गायब केले 22 लाख रुपये
Crime News Mumbai : गेम खेळण्यासाठी मोबाइल मागून दोघांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून 22 लाख रुपयांची चोरी केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Crime News Mumbai : मोबाइलमध्ये गेम खेळण्याच्या नावाने एका ज्येष्ठ नागरिकाला 22 लाखांना लुबाडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी 'गुगल पे' चा वापर करत या ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून 22 लाख रुपयांचा अपहार केला. बेस्टच्या सेवेमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली.
मुंबईमध्ये गोरेगाव पूर्वमध्ये राहणारे प्रकाश नाईक ( 68 वर्ष) हे काही महिन्यांपूर्वी बेस्टमधून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना बेस्ट प्रशासनाकडून त्यांच्या बँक खात्यात त्यांनी केलेल्या सेवेचा मोबदला, देणी म्हणून जवळपास 22 लाख रुपये देण्यात आले. निवृत्तीनंतर प्रकाश नाईक गोरेगावमधील दिंडोशी बस आगाराजवळ दररोज फिरण्यासाठी जात असे. त्या ठिकाणी त्यांची ओळख अनोळखी मुलांसोबत झाली. ओळख झाल्यानंतर त्या दोन्ही मुलांनी प्रकाश नाईक यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गेम खेळण्यासाठी हे दोघेही जण त्यांचा मोबाइल वापरत होते. या दोघांनी मोबाइलमध्ये गुगल पे हे मोबाइल अॅप डाउनलोड करत, त्यांच्या खात्यातून दोन महिन्यात 22 लाख रुपयांचा अपहार केला. ही चोरी इतकी बेमालूमपणे झाली की प्रकाश नाईक यांना याची काही माहितीदेखील झाली नाही.
प्रकाश नाईक एक दिवस बँकेमध्ये आपल्या बँक खात्याबद्दल माहिती घ्यायला गेले होते. त्यावेळी बँकेने माहिती दिल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. या प्रकाराबाबत त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात जाऊन फसवणूक झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. शुभम तिवारी (22 वर्ष) आणि अमर गुप्ता (28 वर्ष) असे आरोपींचे नाव असून त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे दोन्ही आरोपी प्रकाश नाईक यांच्याकडून मोबाइलमध्ये गेम खेळण्याचा नावाने मोबाइल घ्यायचे. त्यामध्ये गुगल पेच्या माध्यमातून आपल्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून घ्यायचे. व्यवहार झाला असल्याचा आलेला मेसेज डिलीट केला जायचा. मोबाइलमधील सर्व पुराव्यांची स्वच्छता केल्यानंतर त्यांना पुन्हा मोबाइल द्यायचे. आरोपींनी अशा प्रकारची फसवणूक इतरांसोबत केली आहे का, याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. आरोपींची चौकशी सुरू असून अधिक तपास दिंडोशी पोलीस करत आहे.